कोयत्याच्या धाक दाखवून विस लाखांची बॅग पळवणारा गजाआड

नाशिक : कोयत्याचा धाक दाखवत विस लाख रुपयांची बॅग हिसकावून नेणा-या चोरट्यास एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे. आदित्य एकनाथ सोनवणे (रा. शांतीनगर, सिन्नर, मुळ रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 211/23 भा.द.वि. 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक 20 मे 2023 रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास माळेगाव एमआयडीसी, सिन्नर येथील भगवती स्टिल कंपनीचे कॉन्ट्रक्ट सुपरवायझर चंद्रदीपकुमार सिंग हे त्यांच्या कंपनीतील कामगार दिपचंद्र जयस्वार यांच्या मोटर सायकलवर डबलसिट बसून कंपनीत जात होते. त्यांच्या ताब्यात कामगारांच्या पगाराचे 20 लाख 53 हजार रुपये होते. सिन्नर येथून माळेगाव औद्योगिक वसाहतीत जात असतांना अनोळखी चोरटयाने हातात कोयता घेवून चंद्रदीपकुमार सिंग यांच्या समोर येत त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली कापडी पिशवी हिसकावून त्या अनोळखी इसमाने जबरीने चोरुन नेली. या घटने प्रकरणी त्यांनी एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला होता.

एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम निकम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळास भेट देत पाहणी केली. तपासात भगवती स्टिल कंपनीच्या आजुबाजूच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. फिर्यादी चंद्रदीप कुमार सिंग यांनी कथन केलेल्या हकीकतीनुसार पडताळणी करण्यात आली. एका काळया रंगाच्या  पल्सर मोटर सायकलने काळा टी-शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या इसमाने हा गुन्हा केला असल्याची त्यांची खात्री झाली. पोलीस निरीक्षक शाम निकम यांना संशयीत इसमाच्या वर्णनाप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा आदीत्य सोनवणे (रा. शांतीनगर, सिन्नर) याने केला असल्याची खात्रीशीर माहीती मिळाली.

त्याचा शोध घेतला असता तो घटना घडल्यापासून फरार असल्याचे तपासात उघड झाले. तो सिन्नर येथून त्याच्या पत्नीस घेवून बाहेरगावी वास्तव्यास जाणार असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी शांतीनगर परिसरात रात्रभर सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. आदित्य सोनवणे याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्याकडून गुन्ह्यातील 18 लाख 94 हजार 500 रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शाम निकम करत आहेत.

यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर अहमदनगर जिल्हयात मालाविरूध्दचे गुन्हे दाखल असलेबाबत माहीती मिळाली आहे. सदर आरोपीस MIDC सिन्नर पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम निकम, सपोनि तुषार गरूड, सपोनि संदेश पवार, पोना भगवान शिंदे, धनाजी जाधव, सागर गिते, नवनाथ चकोर, पोकॉ शशिकांत निकम, विनोद जाधव, चापोकॉ विक्रम टिळे तसेच पोना हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here