जैन हिल्स जळगाव येथे १ जून पासून फालीच्या ९ व्या संमेलनास आरंभ

जळगाव, ३१ मे (प्रतिनिधी):- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील १०८५ विद्यार्थी सहभागी होत आहेत. शाळांमधील इन्होवेशन व कृषी व्यवसाय योजना स्पर्धांचे विजेते असलेले ८ वी व ९ व्या इयत्तेतील विद्यार्थी संमेलनामधे सादरीकरण करतील. संमेलन आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून ते १ जून रोजी पहिल्या टप्प्यास आरंभ होत आहे. 

गत आठ वर्षांपासून महाराष्ट्र व गुजरात राज्यातील विद्यार्थी सहभागी होत असतात. आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व काैशल्ये आणि संधी देऊन पुढील पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावी यासाठी फाली कार्यरत आहे. फाली उपक्रमाने कृषी क्षेत्रात यशस्वी होऊ पाहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती दिशा आणि योगदान दिले आहे. बहुतांश फाली विद्यार्थी घरच्या शेतीत किंवा कृषी उद्योगात काम करतात. प्रामुख्याने कृषी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन या माध्यमातून मिळत असते. आजपर्यंत ३३,००० पेक्षा जास्त विद्यार्थी फाली उपक्रमात सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात महत्त्वाच्या टप्प्यांवर कृषी आणि कृषी-उद्योगाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रोत्साहित करते.

 कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत ‘असोसिएशन फाॅर फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ची स्थापना झाली आहे. यात संचालक म्हणून नादिर गोदरेज (अध्यक्ष, गोदरेज इंडस्ट्रीजचे ), राजू श्राॅफ (अध्यक्ष, यूपीएलचे ), अनिल जैन (उपाध्यक्ष, जैन इरिगेशनचे ) आणि नॅन्सी बॅरी (अध्यक्षा, एनबीए एंटरप्राइझ सोल्युशन्स टू पाॅव्हर्टी) यांचा समावेश आहे. या उपक्रमास गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, जैन इरिगेशन, स्टारअॅग्री, रॅलीज आणि ऑम्निवोर या कंपन्यांचे सौजन्य लाभते.

पहिल्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी १ जून रोजी ४३४ फाली विद्यार्थी आणि सहभागी कंपनी व्यवस्थापकांना जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी २ जून रोजी जैन हिल्स येथील विविध सभागृहात सकाळी ८.०० ते १०.३० दरम्यान फालीचे विद्यार्थी आपले ६२ बिझनेस प्लॅन सादरीकरण करतील. त्यातून सर्वोत्तम बिझनेस प्लॅनची निवड परीक्षक करतील व त्यातून विजेते निवडले जातील. बिझनेस प्लॅन सादरीकरण झाल्यावर लगेच सकाळी १०.३० ते दुपारी २.०० इन्होव्हेशन स्पर्धां सुरू होईल. या स्पर्धेत ६२ शेती विषयक नाविन्यपूर्ण संशोधन व संकल्पनेचे स्टॉल्स असतील. आपण स्वतः विकसीत केलेल्या इन्होव्हेशन्सची माहिती विद्यार्थी देतात. स्पर्धकाच्या प्रत्येक स्टॉलची माहिती परीक्षक घेतात व त्यातून वैशिष्ट्यपूर्ण, नावीन्यपूर्ण संशोधनाची पारितोषिकासाठी निवड करतात. फाली उपक्रमात सहभागी प्रत्येकाला फालीचे बोधचिन्ह असलेले टि शर्ट वितरीत केले जाते. त्याच प्रमाणे या दोन्ही स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात येणार आहे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here