गावठी पिस्टल बाळगणा-या दोघांसह विक्रेत्यास अटक

जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या दोघा तरुणांसह ती विकणारा तरुण अशा तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेरी येथून ताब्यात घेतले आहे. तिघांना गावठी पिस्टलसह जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक प्रितमकुमार पिताबर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर राजेश सुके (रा. कंडारी ता. जळगाव) व गजानन रामेश्वर भोई (रा. नेरी ता. जामनेर) असे गावठी पिस्टल बाळगणा-या दोघांची तर योगेश श्रावण सोनार (रा. जामनेर) असे विक्रेत्याचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र राजाराम पाटील, अक्रम शेख याकुब शेख, महेश महाजन, प्रितम पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, पोलिस नाईक नितीन प्रकाश बावीस्कर, नंदलाल दशरथ पाटील, भगवान तुकाराम पाटील, दर्शन हरी ढाकणे, उमेश गोसावी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

शेखर सुके आणि गजानन भोई हे दोघे विशीच्या आतील तरुण जामनेर तालुक्यातील नेरी येथे गावठी पिस्टल कब्जात बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहका-यांना नेरी येथे पुढील तपास व कारवाईकामी रवाना केले.  

नेरी ते पहूर रस्त्यावरील हॉटेल रोहीणीच्या समोर असलेल्या पानटपरी जवळ या दोघा संशयीत तरुणांना ताब्यात घेत विचारपूस करत त्यांची अंगझडती घेण्यात आली.  त्यांची विचारपुस व अंगझडती दरम्यान त्यांच्या कडे गावठी पिस्टल आढळून आले. अधिक चौकशीअंती ते पिस्टल त्यांनी जामनेर येथील योगेश सोनार याच्याकडून विकत घेतल्याचे दोघांनी कबुल केले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जामनेर येथून त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. तिघांना गावठी पिस्टलसह जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. भारतीय हत्यार कायदा 3/25 नुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशीच्या आतील तरुणांनी पिस्टल बाळगणे हा एक चिंतेचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here