जळगाव, दि. ४ (प्रतिनिधी) – उत्पन्नाच्या दृष्टिने कृषीक्षेत्र म्हणजे बेभो-यासाचे असते. त्यामुळे शेतीत करिअर होऊ शकत नाही अशी नकारात्मकता वाढत असते. मात्र उच्च कृषीतंत्रज्ञानाचा वापर करुन निरीक्षणातून शेतीला यशस्वी करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. शेतीकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे, यासाठी आपल्या पाल्यांना शिक्षणासह शेतीचे ज्ञान दिले पाहिजे. हेच देशाचे भविष्य आहे असे मोलाचे विचार शेतकऱ्यांनी मांडले.
फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी अनेक बाबी जाणून घेतल्या. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड, प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. फलोत्पादनासाठी नर्सरी आणि टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. शेतीत सुरू असलेले नवनवीन संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर ॲण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, टिश्युकल्चर, एरोपोनिक, हार्ट्रोपोनीक शेती, व्हर्टिकल गार्डन यासह अन्य भविष्यातील शेतीचे प्रयोग, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील प्रयोगशील शेतकरी ईश्वर ओंकारलाल पाटील यांनी आपल्या शेतीचा अनुभव सांगितला. पारंपारिक पध्दतीने कंदाची केळी आणि मोकाट पध्दतीने पाणी देऊन कापूस लागवड करत होतो. यातून उत्पन्न जेमतेम येत होते. चांगल्या दर्जाची जैन टिश्यूकल्चरची रोपांसह ठिबकचा फक्त सिंचनासाठी वापर न करता योग्य फर्टिगेशन साठी केला त्यामुळे उत्पन्न वाढले. टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड केल्याने सरासरी ८५ टक्के बागेची निसवण झाली. शिवाय अत्यंत गुणवत्तेची,एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवू लागलो. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिले पाहिजे. लहानपणापासून शेतीचे ज्ञान अभ्यासक्रमात असावे. यातूनच मातृभूमीची सेवा करता येते असे मार्गदर्शन ईश्वर पाटिल यांनी केले.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील प्रगतीशील शेतकरी डिगंबर केशव पाटील यांनी आपल्या ६२ एकर शेतीच्या व्यवस्थापनाविषयी सांगितले. दर वर्षी सुमारे २५ हजार जैन टिश्यूकल्चरची रोपांची लागवड करत असतो. सिंचन पध्दती, खतांचे नियोजन केले तर उत्पादन वाढते आणि आर्थिक समृद्धी साधता येते. यातून मुलांचे उच्च शिक्षण केले असून एक मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ तर दुसऱ्या पुण्याला असल्याचे डिगंबर पाटील म्हणाले.
याच सोबत भागवत काशिनाथ महाजन (गोरगावले), ऋषिकेश अशोक महाजन (नायगाव ता. मुक्ताईनगर) यांनी आपल्या शेती आणि शेतीतील विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराव्दारे सांगितली. यावेळी सृष्टी ऐनापुरे (कोल्हापूर), दिया गायकवाड (सातारा), कुंजन ससाले, निलेश चौधरी (धुळे), समिक्षा मिश्रा (यवतमाळ),पलक कोलते (अमरावती) हे फालीचे विद्यार्थी व्यासपिठावर होते.
याच कार्यक्रमात ज्या कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे अशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फाली विद्यार्थ्यांचा मुक्तपणे संवाद झाला. यात गोदरेज अॅग्रोव्हॅटचे वरिष्ठ ॲग्रोनाॕमिस्ट मोहित व्यास, युपीएल कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रदीप पाटील, ओमनीवोर च्या कम्युनिकेशन हेड सबोरणी पोतदार, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, रॅलीज इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी अजय तुरकणे, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे शुभम दुगडे, अमुलचे बी. एम. भंडारी, अॕक्सीस बँक चे किरण नाईकवाडे, उज्ज्वल फायन्सचे दीपक रावल यांचा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फालीच्या व्यवस्थापिका रोहिणी घाडगे यांनी केले.