प्राणघातक हल्ला करणा-या जितेंद्र खंडारे यास अटक

जळगाव : भुसावळ तालुक्यातील खडके एमआयडीसी परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करणा-यास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अटक करण्यात आली आहे. जितेंद्र भागवत खंडारे (रा. खडके तालुका भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ उप विभागीय अधिका-यांच्या विशेष पथकाने या कारवाईत सहभाग घेतला होता.

7 जून रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास खडके एमआयडीसी परिसरात सोना डेअरीनजीक सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गिरीष देविदास तायडे हा तरुण त्याचा ड्रायव्हर आकाश सुरेश सपकाळे याच्यासह आला होता. गिरीष तायडे याच्यासोबत जितेंद्र खंडारे याचा वाद होता. त्यावेळी जितेंद्र खंडारे त्या ठिकाणी आला. जितेंद्र खंडारे याने धारदार हत्याराने गिरीष तायडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेत गिरीष तायडे याच्या डाव्या मानेवर, डाव्या हाताच्या कोप-यावर, डाव्या बगलेत, डाव्या बाजुस पोटावर, डाव्या कमरेवर खंडारे याने गंभीर वार केले होते. गुन्हा घडल्यानंतर हल्लेखोर जिंतेंद्र खंडारे हा फरार झाला होता.  

फरार जिंतेद्र खंडारे याच्या शोधकामी उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी विशेष पथकाची निर्मीती केली होती. या पथकात उप विभागीय कार्यालयातील पोहेकॉ सुरज पाटील यांच्यासह भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमधील पोहेकॉ प्रेम सपकाळे, पोना दिपक जाधव यांचा समावेश करुन त्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. या पथकाने रात्रंदिवस परिश्रम घेत शिंदी, वरणगांव, वराडसिम, कानळदा, नांद्रा आदी परिसरात शोध मोहीम राबवली. मात्र जितेंद्र खंडारे मिळून येत नव्हता.

फरार जिंतेंद्र खंडारे हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे असल्याची गुप्त माहिती उप विभागीय अधिकारी पिंगळे यांना समजली. फरार हल्लेखोर जितेंद्र भागवत खंडारे हा अहमदाबाद येथे त्याच्या बहिणीकडे असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले. प्रवासादरम्यान पथकाला मिळालेल्या नव्या माहितीनुसार खंडारे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे गेला असल्याचे समजले. त्यामुळे तपास पथक सिन्नर येथे रवाना झाले.

सिन्नर गावातील हॉटेल शाहू येथे जिंतेंद्र खंडारे हा येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याठिकाणी सापळा लावण्यात आला. आलेला इसम खंडारे हाच असल्याचीखात्री पटल्यानंतर त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह  सहायक पोलिस निरीक्षक  अमोल पवार, सहायक फौजदार मोरे, पोहेकॉ संजय तायडे, पोहेकॉ विठठल फुसे, पोना पालवे आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here