सन 2019 मधे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे नेतृत्वाची एकसंघ शिवसेना सहभागी झाली. तेव्हा शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा भाजपाने आरोप केला. त्यावर ठाकरे यांनी “आमचे शेंडी – जाणव्याचे हिंदुत्व नाही” म्हणत हिंदुत्व सोडले नाही असे सांगितले. नंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शब्द दिल्याचा वाद गाजला. जो अजुनही गाजतोय.
नंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे गट सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे भाजपाच्या साथीने सत्तेत आला. तेव्हा सर्वप्रथम ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व रक्षणासाठी भाजपासोबत आल्याचे शिंदे गट म्हणाला. काही महिण्यांनी त्यांनी अजितदादांनी निधी दिला नाही असे दुसरे कारण पुढे केले.
त्यापुर्वीच 50 खोके घेऊन हे गद्दार फुटले अशी जोरदार ओरड झाली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेस (ज्यात अजितदादाही होते) ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस पक्ष होते. विकास निधी प्रकरणात अजितदादांवर खापर फोडून झाले. तेच अजितदादा त्यांच्या गटासह राज्य मंत्री मंडळात पुन्हा अर्थमंत्री बनले आहेत. आताही पक्षनिधीची ओरड सुरु आहेच. त्यामुळे पक्ष फोडणे, वेगळी वाट पकडणे यासाठी आमदारांची सर्व कारणे खोटी होती असे म्हटले जाते. सत्ता आणि सत्तेतून मिळणारा पैसा मग तो पक्षनिधी म्हणा, खोके म्हणा की विकासाचा वाटा म्हणा. रस्त्यात दगड टाकून रस्तालुट होते. कुणी दरोडे घालतो. हातात कोणतेही शस्त्र न घेता व्हाईटकॉलर्ड लुटही केली जाते. ते बहुधा जनता अद्याप विसरली नाही. उगाच निधी देत नाही म्हणून अजितदादांच्या नावे ओरडण्यात काय अर्थ आहे. कुंपणावर बसून कोण कसे शंभर – दिडशे कोटी उकळतो ते देखील महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. हतबल मतदार, हतबल करदाते आणि हतबल अण्णा हजारे.