चाळीसगावच्या सायबर गुन्हेगारांकडून तिन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक/जळगाव : एएफपीएस अर्थात आधार इनेबल पेमेंट सिस्टीमच्या माध्यमातून अंगठ्यांचे ठसे वापरुन बॅंकेतून ग्राहकाच्या संमतीविना परस्पर पैसे काढून घेणा-या चाळीसगव तालुक्यातील तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण सायबर पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील समाधान संजय घुगे यांचे बेहळगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खाते आहे. या खात्यातून 2 लाख 66 हजार 799 एवढी रक्कम त्यांच्या अंगठ्याच्या ठशांचा वापर करुन परस्पर अज्ञातांकडून काढून घेण्यात आली होती. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिस स्टेशनला गु.र.न. 8/23 भा.द.वि. 420, सह आयटी अ‍ॅक्ट 66 क, 66ड नुसार अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

नाशिक ग्रामीण सायबर गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिकदृष्टया केलेल्या तपासादरम्यान किशोर लक्ष्मण सोनवणे (रा. उपखेडा, ता. चाळीसगांव, जि. जळगांव), रविंद्र विजय गोपाळ (रा. बानगांव, ता. चाळीसगांव जि. जळगांव आणि सोमनाथ काकासाहेब भोंगाळ (रा. बाणगांव, ता. चाळीसगांव जि. जळगांव) यांची नावे निष्पन्न झाली. त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस कोठडी दरम्यान तिघांकडून त्यांनी गुन्हयात वापरलेले चार मोबाईल, चार लॅपटॉप, चार बायोमॅट्रीक फिंगर स्कॅनर, एक आयरीस मशिन, एक फेस कॅमेरा तसेच फसवणूकीच्या रकमेतून खरेदी केलेल्या दोन टीव्हीएस कंपनीच्या रेडर मोटर सायकली असा एकुण 2 लाख 83 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पो.नि. सत्यजित आमले व त्यांच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

अटकेतील आरोपींनी जानेवारी 2023 मधे नांदगाव तालुक्यातील पळाशी व वेहेळगाव येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प घेतला होता. या कॅम्पमध्ये बायोमॅट्रीक फिंगर स्कॅनरव्दारे उपस्थित नागरीकांच्या अंगठयांच्या ठशांचा डाटा संकलीत केला होता. आरोपींनी CSC Digipay ऑनलाईन मनी ट्रान्सफर सर्व्हिस अॅपमध्ये नागरीकांच्या ठशांचा वापर करुन बँक खात्यांवरून परस्पर पैसे काढून घेतले होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here