कन्नड घाटात अवजड वाहनांना बंदी – औरंगाबाद खंडपीठ

छ. संभाजीनगर : कन्नड (औट्रम) घाटातील अवजड वाहनांच्या वाहतुकीला 11 ऑगस्ट 2023 पासून औरंगाबाद खंडपीठाने बंदी घातली आहे. आगामी सात दिवस शासकीय यंत्रणेने याबाबत प्रबोधन करण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत. गौताळा अभयारण्यातून वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ॲड. सुहास उरगुंडे यांनी दिलेला प्रस्ताव न्यायालयाने नाकारला आहे. वन्यप्राण्यांची कमी होत असलेली संख्या बघता त्यांचे रक्षण करणे गरजेचे असून कोणत्याही परिस्थितीत हा पर्यायी मार्ग काढता येणार नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. घाटातून अवजड वाहतूक बंद केल्यास टोलच्या माध्यमातून मिळणारा महसूल बंद होणार असल्याचे ॲड. उरगुंडे यांनी म्हटले होते. ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. श्रीकृष्ण चौधरी व ॲड. नीलेश देसले यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घालण्यात आली आहे. सैन्य दलासह निमलष्करी दलाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर काळे यांनी केली. मात्र सैन्य दलाच्या जवानांसह केवळ वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. केवळ आणीबाणीची परिस्थिती असल्यास परवानगी घेऊन सैन्य, निमलष्करी दल, पोलिस दल आदींची वाहने घाटातून जाऊ शकतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

बंदी घालण्यात आलेल्या अवजड वाहनांसाठी छत्रपती संभाजीनगर- दौलताबाद टी पॉइंट-शिऊर फाटा- वाकला- पिंपरखेड- न्यायडोंगरी – चाळीसगाव असा पर्यायी मार्ग राहणार आहे. चाळीसगावला न जाणाऱ्या परंतु धुळे व त्यापुढे जाणाऱ्या जड वाहनांना नांदगाव- मालेगाव-मुंबई -आग्रा महामार्गाने धुळे व पुढे जाता येईल.

शेतकऱ्यांच्या गाड्या, दुचाकी, चारचाकी, सर्व राज्य मंडळाच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, घाटात गाडी अडकल्यास काढण्यासाठी क्रेन, फायर ब्रिगेडची वाहने, हलकी वाहने आदींना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय परिवहन अधिकारी, दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक आदींना याबाबत  अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here