यमद्वार ठरलेल्या जळगावात 18 कोटींचे कोरोनाबळी ; कोविड रुग्णालयासह आरोग्य यंत्रणेच्या अब्रुचे धिंडवडे

subhash wagh

महाराष्ट्रभर कोरोनाने कसे थैमान घातले आहे या संदर्भातील बातम्यांमुळे कोट्यावधी गोरगरिबांचे जीवनस्वास्थ बिघडत आहे. असे असतांना जळगाव जिल्हयात पुन्हा एकदा जनसामान्यांच्या आरोग्य रक्षणाची धुळधाण उडाली आहे. जळगाव जिल्हयातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख बघून जळगावच्य कोविड रुग्णालयाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. मंत्री महोदयांचा दौरा आटोपल्यानंतर काही दिवसातच या रुग्णालयातून 82 वर्षाची वृद्ध रुग्ण महिला गायब झाली. त्यानंतर या वृद्ध रुग्ण महिलेचा थेट मृतदेहच रुग्णालयाच्या टॉयलेट मधे मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे निघाले असून जिल्हावासीयांमधे संतापाची लाट उसळली आहे. जळगावचे सिव्हिल हॉस्पीटल कोविड रुग्णालय म्हणून घोषित करणे, तेथून ते वारंवार इकडे तिकडे हलवण्याचे आदेश काढणे, सिव्हिल हॉस्पीटलमधील डॉक्टर्स मंडळीतील गाजलेला वादविवाद, टोळी युद्ध सदृष्य निर्माण झालेला ताणतणाव, सफाई कर्मचा-यांचे वेतन विषयक आंदोलन, जिल्हा प्रशासनाने आवळलेला फास यात शेकडो रुग्णांचा बळी तर गेलाच शिवाय हजाराचा पल्ला गाठणारी कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवत आहे. जळगाव सिव्हील हॉस्पीटलमधे एका वृद्ध महिलेचा मृतदेहच टॉयलेट मधे आढळून आल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, महानगरपालिका आयुक्त, स्थानिक आमदार, दोन्ही खासदार, माजी मंत्रीगण जनतेच्या रोषास पात्र ठरले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या गचाळ कारभाराबद्दल स्थानिक वृत्तपत्रासह सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याचे आरोग्य सचिव, मंत्री , मुख्यमंत्री, पंतप्रधानांपर्यंत तक्रारींचा पाऊस पाडला. संबंधीत वृद्धेच्या अत्यंत दुर्दैवी म्हणावा अशा अवस्थेतील मृत्यूबद्दल आठवडाभर कुणालाही थांगपत्ता नसावा याबद्दल जनतेत अत्यंत तिव्र प्रक्षोभाची भावना उमटली. त्यातच भरीस भर म्हणून जळगाव शहराचा भाग  बनलेल्या मेहरुण येथील गंगाधर महाले नामक रुग्णाने प्रकृती अस्वास्थतेमुळे शहरातील सात रुग्णालयांची दारे ठोठावली. तरी देखील त्यास उपचार मिळाला नाही. त्याचाही मृत्यू झाल्याने जळगाव शहरात आरोग्य सेवेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकल्याचे बोलले जात आहे. जनसामान्यांच्या किफायतशीर आरोग्य सेवेच्या अशा चिंधड्या उडाल्यामुळे सरकारी कारवाईचा एक भाग म्हणून “डीन” भास्कर खैरे यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले आहे. परंतू या मलमपट्टीने जळगावातील पाच लाखावर नागरिकांचे समाधान होण्याची सुतराम शक्यता नाही. याचे कारण म्हणजे या सिव्हील हॉस्पीटलला यमद्वार ठरलेल्या सध्याच्या अनागोंदीला  प्रचंड भ्रष्टाचाराची रुपेरी किनार जोडली असल्याचेही हळूहळू समोर येवू लागले आहे. कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन पासून आरोग्य रक्षणार्थ जवळपास 275 आदेश काढण्यात आले. शिवाय जिल्हा नियोजन समिती व आमदार निधीतून कोविड रुग्णालयाला तब्बल 18 कोटी रुपयांचा प्रचंड निधी देण्यात आला. एवढा प्रचंड निधी देवूनही कोरोनाबाबत जिल्हयाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने हा दोष नेमका कुणाचा? असा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर काही मंडळींनी जिल्हाधिका-यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवत असतांना काही राजकारणी मंडळींनी रुग्णांचा कैवार घेवून अधिका-यांना निवेदने दिल्याने त्यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप होतांना दिसत आहेत. तसेच खालच्या फळीतील काही कार्यकर्ते  चमकोगिरी करत असल्याचे देखील बोलले जाते. तथापी जळगावातील जागृत माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता आणि शिवराम पाटील यांनी सोशल मिडीयावर जळगावात बिघडलेल्या सिव्हील हॉस्पीटलसह एकुणच आरोग्य यंत्रणेवर जोरदार ताशेरे ओढत थेट न्यायालयीन लढ्याचे रणशिंग फुंकले आहे.

जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोनाविरुद्ध एक प्रकारे युद्ध पुकारुन जनसामान्यांच्या जीवन बचावासाठी योद्धा  बनून जिवाची बाजी लावणारा पोलिस  प्रशासनातील एक वर्ग दिसून येत आहे. असे असतांनाच या अडचणीतही “स्वार्थाचे मळे” पिकवणारा काही जणांचा स्वार्थी अजेंडा दिसून येत आहे. राज्याचे माजी मंत्री (पशु संवर्धन व दुग्ध विकास) महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष कम साहेब  दोडतल्ले यांच्याकडे 30 कोटी रुपयांची खंडणी मागणा-या एका डॉक्टरने कोरोना बाधितांवर उपचार करण्याच्या नावाखाली न्यायालयातून जामीन मिळवला. या खंडणी प्रकरणात डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे यास अटक करुन येरवडा तुरुंगात ठेवले होते. हा डॉक्टर तुरुंगातून सुटल्यावर खरच कोरोना बाधितांची सेवा करतो की नाही हे कुणी बघायचे? जळगाव जिल्हयातील आणखी एका माजी मंत्र्याच्या कथीत पी.ए. किंवा समर्धकाने मुंबईत एका प्रकरणात 30 कोटी रुपये मागण्याचा प्रताप केला होता. त्याचा मंत्री महोदयांना खुपच त्रास झाला होता. इतकेच नव्हे तर बिड जिल्हयात गेवराईलगत तलवाडा फाटा येथे काही दिवसांपुर्वी डॉ. सुधाकर चोरमले या डॉक्टरनेच कमीशनचा हिस्सा देत नाही म्हणून एका औषध दुकानाला आग लावली. औषध दुकान मालक आणि डॉक्टरमधे कमिशन देण्याघेण्याचा वाद असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. डॉक्टर महोदयांनी औषध दुकानाची डुप्लिकेट चावी तयार करुन आग लावली खरी, परंतू सॅनीटायझर आणि फ्रीज मधील गॅसच्या स्फोटात डॉक्टरसह कंपाउंडर ठार झाला. अशाच पद्धतीने जळगाव जिल्हयात देखील सिव्हील हॉस्पीटल मधील टॉयलेट सफाईचा ठेका संकटमोचक समर्थकांचा असल्याची बाब सोशल मिडीयावर सांगीतली जात आहे. गेल्या काही वर्षापासून सिव्हील हॉस्पीटल मधील परिचारक ते अनेक जागांची नोकरभरती प्रक्रिया राजकारण्यांनी किंवा त्यांच्या हस्तकांनी आणलेल्या याद्यांमधून व्हावी असा आग्रह धरल्यानंतर झालेल्या वादानंतर थांबवण्यात आल्याचे सांगतात. शिवाय सिव्हील हॉस्पीटल मधील काही स्टाफची भरती देखील माजी पालकमंत्र्यांच्या कृपा प्रसादाने झाल्याचा आरोप सोशल मिडीयातून करण्यात आला आहे. स्पष्टच बोलायचे झाल्यास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे की डावे हात समजले जाणारे आणि राज्यातील युपीए राजवटीतील मंत्रीगणांवर टेंडर मंजुरीकामी पाटबंधा-यात ठेकेदारांकडे 10 ते 20 टक्केवारी झाल्याचा आरोप करणारे श्रीमान गिरीषभाऊ महाजन यांनी प्रचंड उत्साहाने महाआरोग्य शिबीरे भरवली. त्यात एक जळगावी देखील झाले. तसे पाहिले तर गिरीषभाऊंचा आरोग्य सेवेचा उत्साह एवढा दांडगा की त्यांनी मतदारसंघातील मतदारांसाठी मुंबईत आरोग्यदूत नेमून मतदार जनतेच्या भल्यासाठी आरोग्य खाते ढवळून काढले. अनेक वैद्यकीय अधिका-यांना अजिबात झोपू न देता रुग्णांच्या सेवेत कामास लावले. त्यामुळे तत्कालीन आरोग्य मंत्र्यांना घरी बसवून आरोग्य खातेही याच उत्साह मुर्तीकडे सोपवावे असे म्हटले जात असे.

विशेष म्हणजे जळगाव जिल्हयाच्या राजकारणात गिरीषभाऊ तत्कालीन राजकीय स्पर्धकांना थप्पीला लावून जोशात पुढे आल्याचे म्हटले जाते. जिल्हयातील कोरोना बाधीतांच्या अवस्थेवर त्यांनी देखील ताशेरे ओढले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोविड म्हणून घोषीत यंत्रणेवर 18 कोटीचा रसद पुरवठा तयार ठेवल्यावर देखील ज्या पद्धतीने जिल्हा रुग्णालय(सिव्हील) गायब होणे, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाकडे वर्ग करणे, काही रुग्णालये अधिग्रहीत करणे, पुन्हा पुन्हा निर्णय बदलणे यात काही सामाजिक कार्यकर्त्यांना कुणाचे तरी हितरक्षण करण्यासह “मांडवली” खान्देशी भाषेत “तोडीपाणी” झाल्याचा वास येवू लागला आहे. खरे तर जळगावचे सिव्हील हॉस्पीटल हे पेशंट पळवण्याचा अड्डा म्हणून कुप्रसिद्धीस आले होते. इतकेच नव्हे तर काही वर्षापुर्वी पोस्टमॉर्टम रुम मधे डेड बॉडीचे पोस्टमॉर्टम करणा-या एका महिला डॉक्टरचेही तेथील अनधिकृत कर्मचा-याने हत्या केल्याचे प्रकरण तेव्हादेखील गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोक प्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्र्यांच्याही राजीनाम्याच्या मागण्या पुढे रेटण्यात आल्या. परंतू बहुतेकांनी नैतिकता कोळून प्यायल्याने म्हणा की नैतीक राजकारणाचे दिवस संपल्यामुळे कुणीही पदाचा राजीनामा द्यायला तयार नाही. या राजकीय  कोडगेपणाला काय म्हणावे? इकडे कोरोनामुळे माणस मरु लागली आणि तिकडे मुंबईत राज्यपाल नियुक्त आमदारकीची साठमारी रंगली आहे.

subhash-wagh

सुभाष वाघ – पत्रकार जळगाव  

8805667750    

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here