नरकयातना भोगण्याचे ठिकाण जळगावचे रुग्णालय गोदावरी रुग्णालयात रात्रीचा थरार व रुग्णाची दैनावस्था

Godavari hospital jalgaon

जळगाव येथील वैद्यकीय सोयी सुविधांचे नाव काढतात अनेकांना दरदरुन घाम फुटतो. असे म्हणातात की जन्म मरण यातना नरकात भोगाव्या लागतात. मात्र त्याच मरण यातना मृत्यू होण्याआधी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना अनुभवायला मिळत आहे. त्या नरकयातना मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून जळगावकडे पाहिले जात आहे. जळगाव शहराचे नाव भारतात कुप्रसिद्धी मिळवत असल्याचे दिसून येत आहे.  असाच काहीसा प्रकार दिनांक 13 जून 2020 रोजी रात्री चाळीसगाव येथून जळगाव येथे आलेल्या एका रुग्णाच्या संदर्भात बघावयास मिळाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव येथे राहणारे एस.टी.  कर्मचारी असलेले आबा नालकर यांची बहीण मंदार राखुंडे यांची प्रकृती खराब झाली होती. वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी त्यांना चाळीसगाव येथील शैलजा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी रुग्ण व नातेवाईकांना गोदावरी मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल येथे पाठवण्यात आले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास संपूर्ण राखुंडे परिवार गोदावरी मेडिकल कॉलेज व हॉस्पीटल येथे दाखल झाला. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतेही सहकार्य न करता त्यांना दवाखान्यात प्रवेश देण्यास मनाई केल्याचे या परिवाराचे म्हणणे आहे. यावेळी काही वेळातच मुसळधार पाऊस सुरु झाला व या परिवाराची दैनावस्था सुरु झाली. बाहेर मुसळधार पाऊस सुरु असतांना अतिशय विदारच  चित्र निर्माण झाले.

वारंवार विनवण्या करुन देखील रुग्णालयातील कर्मचारी रुग्णास दाखल करुन घेत नव्हते. रात्रीचा काळोखात रुग्णाला होणारा त्रास असहय झाला होता. खुप वेळाने कसाबसा रुग्णास प्रवेश मिळाला. मात्र बाहेर पडणा-या पावसाचे पाणी रुग्णालयात येण्यास सुरुवात झाली. बघता बघता पावसाचे पाणी दवाखान्याच्या तळमजल्यावर व्यापले गेले. सर्वत्र गुडघाभर पाणी साचल्यामुळे व वाहणा-या पाण्यामुळे एकुणच परिस्थिती गंभीर झाली होती.

दरम्यान यापुर्वीच दाखल झालेल्या एका विषबाधीत रुग्णासह त्याच्या परिवाराचा आक्रोश सुरु होता. विषबाधीत तरुणीचा मृत्यु झाल्यामुळे तो आक्रोश सुरु होता. आज रविवारी सकाळी तेथील कर्मचा-यांनी चाळीसगाव येथील त्या रुग्णाच्या परिवाराला सांगण्यात आले की आज रविवार आहे. रविवारी डॉक्टर येत नसून तुम्ही दुस-या दवाखान्यात जा असा सल्ला त्यांना देण्यात आला.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हा परिवार दुसरीकडे उपचारासाठी जाण्यासाठी खासगी वाहनाच्या शोधात होते. या परिवाराने मदतीची याचना केली आहे. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते  व माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांच्यामुळे उघडकीस आला. या भयभित परिवाराने दिपक कुमार गुप्ता यांचेशी संपर्क साधून आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला व या प्रकाराला वाचा फुटली आहे.

सोबत या घटनेचा व्हिडीओ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here