ट्रक जाळपोळ प्रकरणी 19 जणांना अटक

जळगाव : गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयातून जमावाने केलेल्या हल्ल्यासह ट्रक जाळण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी 19 जणांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्या  पाळधी गावात पोलिसांचा अकुंश असून वातावरण शांत आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता बाळगावी असे जळगाव पोलिस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी औरंगाबाद येथुन शर्मा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालवाहू ट्रक  (UP 93 AT 8135) हा (चामडे) भरुन कानपूर उत्तर प्रदेश येथील लेदर फॅक्ट्रीत जात होता. त्या ट्रकवर सल्लु खान बाबु खान हा चालक आणि मानसिंग श्रीराम कुशवाह हा क्लिनर असे दोघे जण हजर होते. दरम्यान बांभोरी नजीक काही समाजकंटकांनी  या मालवाहतूक करणा-या ट्रकचा पाठलाग केला. पाळधी ता.धरणगाव येथे या ट्रकला अटकाव करण्यात आला. पोलीसांनी सामंजस्याने हस्तक्षेप करत जमावाला कायदा हाती न घेण्याचे आवाहन केले होते.

पशुवैद्यकिय अधिका-यांना घटनास्थळी बोलावून ट्रकमधील जनावरांच्या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले आहे. बेकायदेशीर जमलेल्या जमावातील काही समाजकंटकांनी पोलीसांवर दगडफेक करून पोलीस वाहनांची तोडफोड केली. याशिवाय ट्रकवरील चालक सल्लु खान बाबु खान व क्लिनर मानसिंग श्रीराम कुशवाह यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न करत ट्रक पेटवून देण्यात आला. ट्रकचालक व क्लिनर या दोघांचा जिव वाचवून अग्नीशमन दलाच्या मदतीने पेटलेला ट्रक विझवण्यात आला. या घटनेला अनुसरुन धरणगाव पोलीस स्टेशनला गु.र.नं.289/23  भादवि कलम 307, 353, 332, 435, 143, 147,  427 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 सह मपोका कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण अकरा समाजकंटक आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.

पाळधी ता.धरणगाव येथील सामाजीक वातावरण आता शांत आहे. जाळण्यात आलेल्या ट्रकमध्ये जनावराचे कातडे (चामडे) असून गोमांस नसल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. तरी देखील त्या कातड्यांचे नमुने तपासणीकामी पाठवण्यात आले आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये. कायदा कुणी हातात घेवू नये तसेच शांतता भंग करु नये असे जळगाव पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here