लाचखोर लेखाधिकारी भास्कर जेजूरकरकडे एसीबीला सापडले घबाड

नाशिक : खासगी इमारतीच्या भाडे देयकाच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा आदिवासी विकास विभागाचा संशयित लेखाधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर यास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एसीबी पथकाच्या जाळ्यात सापडलेल्या जेजुरकर याच्या घरझडती दरम्यान मोठे घबाड मिळाले आहे. रोकड, दागिने, घरासह सुमारे 18 लाखांची मालमत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी जेजुरकर यास रंगेहाथ एसीबी पथकाने पकडले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेजुरकर यांची मालमत्तेची झाडाझडती सुरु केली त्यात पथकाला 76 हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिन्यांसह अन्य काही मौल्यवान वस्तू अशी 18 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. जेजुरकर यांनी यापेक्षाही अधिक ‘माया’ जमविली आहे, का याचा शोध घेतला जाणार आहे. अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधिक्षक माधव रेड्डी, उप अधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत व कर्मचा-यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here