आठ दरोडेखोर मुक्ताईनगर पोलिसांच्या अटकेत

जळगाव : जामनेर शिवारातील वाडी परिसरातील ढाब्यावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ दरोडेखोरांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून जवळपास सात ते आठ अनोळखी इसम आले. आलेल्या सर्वांनी ढाब्याचे कामकाज बघणा-या गणेश रवींद्र बडगुजर याच्या डोक्याला पिस्टल लावली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आपल्या मागावर येत असल्याची कुणकुण लागताच मुक्ताईनगरच्या दिशेने पळून जाणा-या दरोडेखोरांची कार मुक्ताईनगर पोलिसांनी रस्त्यात अडवली आणि आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

मुकेश फकीरा गणेश (४२), शेख भुरा शेख बशीर (३८, दोघे रा. शहापूर, जि. बऱ्हाणपूर), शेख शरीफ शेख सलीम (३५, रा. इच्छापूर), शाहरुख शहा चांद शहा (२०, रा. उज्जैन), अज्जू उर्फ अझरुद्दीन शेख अमीन (३६, रा. अमीपुरा बऱ्हाणपूर), अंकुश तुळशीराम चव्हाण (३०, खापरखेडा), खजेंदर सिंग कुलबीर सिंग (४०, रा. लोधीपुरा, बऱ्हाणपूर) आणि शेख नईम शेख कय्युम (४५, रा. शहापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ६९ हजार रुपये रोख, चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, सुरा, सहा लाखांची चारचाकी कार, ४१ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल असा आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला अटकेतील दरोडेखोरांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सागर काळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here