जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिस दलातर्फे प्रथमच महिलेविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धनुबाई उर्फ धनु यशवंत नेतलेकर असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. धनुबाई उर्फ धनु यशवंत नेतलेकर या महिलेविरुद्ध दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 प्रमाणे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय या महिलेविरुध्द तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत.
धनुबाई या महिलेची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी प्रस्ताव तयार केला होता. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या निर्देशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी या प्रस्तावाला मूर्त स्वरूप देऊन तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना केला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.