बुलढाणा : बुलढाणा जिल्हयासह संग्रामपुर तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस नसल्यामुळे संग्रामपुर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संग्रामपुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा व शेतकऱ्यांना त्यांचा पिक विमा मंजूर करा या मागणीचे निवेदन संग्रामपूर तालुका किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना देण्यात आले.
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सोयाबीन, कपाशी, तूर, मुंग ,उडीद ,मका, ज्वारी आदी खरिपातील पिकांनी माना टाकल्या आहेत दिनांक 22 जुलै रोजी तालुक्यात अचानक अतिवृष्टी झाल्याने व ढगफुटी झाल्याने नाला नदीकाठलगतची हजारो एकर शेतातील उभे पिके खरडून गेले आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी महसूल विभागाने ताबडतोब केली, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गत महिन्यापासून पावसाने खंड दिल्याने पिके सुकत आहेत त्यामुळे संग्रामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी व संपूर्ण पिक विमा मंजूर करण्यात यावा तसेच अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. अन्यथा 20 सप्टेंबर 2023 पासून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर किसान सेना तालुकाप्रमुख अमोल ठाकरे, शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उपतालुकाप्रमुख, राहुल मेटांगे धनंजय अवचार, विठ्ठल गोतमारे मनोज साखरे ,बाळकृष्ण गोतमारे, सुनील मुकुंद ,शेख अब्दुल शेख लुकमान, धनसिंग ठाकूर ,अमोल देशमुख ,पुरुषोत्तम मारोडे, सुमित डोसे, ज्ञानेश्वर डोसे, सतीश डोसे ,विशाल बांगर, जितेंद्र तायडे, संतोष नायशे, सागर मारोडे, भूषण जळमकार, अशोक गायकवाड आदी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.