जळगांव – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ – J, ७५३ – L व ७५३ – F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी. संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकारी यांना द्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जमीनधारकांना भूसंपादन अधिकारी यांनी दिलेला मोबदला दर व रक्कम मान्य नसल्यास सक्षम वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मूभा उपलब्ध आहे. यासाठी मोबदला रक्कम स्वीकारली आहे व ताबा दिला आहे. म्हणून कोणतीही अडचण राहणार नाही. लवाद तथा जळगांव जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाखल लवाद अर्ज प्रकरणी सर्व संबंधितांचे म्हणणे सादर करणेकामी अंतिम संधी म्हणून १३ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत आलेल्या लेखी म्हणणेच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे व त्यामध्ये मतभेदाचे मुद्दे असतील,तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. यामुळे सदर कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकत असल्यास. लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक राहिल व त्यानंतर प्रकरणी संधी देण्यात येऊन त्यासाठी मुदत जाहीर करण्यात येईल. पुरेशी संधी देण्यात येऊन दोन्ही बाजूचे मुद्यांची लेखी स्वरूपात समाधानकारक पूर्तता झाल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात येईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.