बनावट नॉन क्रिमिलेअर दाखला – सेतु केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा

जळगाव : बनावट नॉन क्रिमिलेअर दाखला दिल्याचे उघडकीस आल्याने सेतू केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील म्युनिसिपल पार्क परिसरात उत्तम काशिराम इंगळे यांचे इंटरनेट ऑनलाईन सर्व्हिस या नावाने महा ई सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) असून त्यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 नोव्हेंबर 2021 रोजी एका तरुणीने नॉन क्रिमीलेअर दाखला मिळण्यासाठी या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रे सादर करुन ऑनलाईन अर्ज केला होता. सेतू चालकाने या तरुणीला 30 नोव्हेंबर 2021 रोजी नॉन क्रिमिलेअर दाखला दिला. त्यानंतर या तरुणीची मुंबई पोलिस दलात निवड झाली. तिने शासनाकडे सादर केलेले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र पडताळणीसाठी भुसावळ तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाले. हे प्रमाणपत्र ऑनलाईन डेटा बेसवर आणि महा आयटी सेल मुंबई येथे मॅच झाले नाही. एकंदरीत सेतू केंद्र चालक उत्तम इंगळे यांनी हा दाखला बनावट दिल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान नॉन क्रिमीलेअर दाखला पडतळणीकामी तहसीलदारांनी कागदपत्र मागवले असल्याचे सांगत सेतू केंद्र चालकाने या तरुणीकडून तिचे कागदपत्र पुन्हा घेतले. या तरुणीची समंती न घेता अथवा तिला कोणतीही माहीती न देता सेतू केंद्र चालकाने तिच्या नावे नॉन क्रिमीलेअर दाखला मिळण्याकामी बनावट अर्ज सादर केला. या अर्ज प्रकरणात तरुणीच्या वडीलांच्या नावाचा तलाठ्याचा बनावट उत्पन्नाचा दाखला जोडून सादर केल्याचे निष्पन्न झाले.  याप्रकरणी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नायब तहसीलदार प्रिती लुटे यांनी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय कंखरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here