सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावरुन उसळला वाद, महिला गंभीर जखमी

जळगाव : घराच्या ओट्यावर सीसीटीव्ही लावण्यावरुन दोघा शेजा-यांमधे झालेल्या वादाची परिणीती मारहाणीसह जखमी करण्यात झाली. या घटने प्रकरणी दोघा महिलांसह एकुण पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथील भोसले गल्लीत जयश्री शंकर ठाकुर या गृहीणी राहतात. त्यांच्या घराच्या ओट्यावर सीसीटीव्ही लावण्याचे कामकाज सुरु होते. त्यांच्या शेजारी राहणा-या लोकांनी त्यांना म्हटले की तुमच्या घराच्या अंगणात कॅमेरे लावू नका. त्या कॅमे-यांचे तोंड आमच्या घराकडे लावू नका. त्यावर जयश्री ठाकुर यांनी शेजारी राहणा-या लोकांना म्हटले की हे घर आमचे आहे. आम्ही कॅमेरे कसेही लावू, तुम्ही आम्हाला बोलणारे कोण? जयश्री ठाकुर यांच्या बोलण्याचा शेजारी राहणा-या लोकांना राग आला.

त्यामुळे सुनिता विनोद खाडे, ललिता बाळू खाडे आदींनी जयश्री ठाकुर यांना त्यांच्या घराच्या ओट्यावरुन खाली ओढत छातीत व पोटात तसेच कानशिलात चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. जयश्री ठाकुर यांना होत असलेली मारहाण बघून त्यांचे पती शंकर विनायक ठाकुर यांनी जोरजोरात आरोळ्या मारुन गल्लीतील लोकांना मदतीची याचना केली. मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. दरम्यान दोन्ही महिला जयश्री ठाकुर यांना मारहाण करत असतांना गोलु बाळू खाडे हा त्याठिकाणी आला. त्याने देखील जयश्री ठाकुर यांना मारहाण केली.

यावेळी जयश्री ठाकुर यांची तेरा वर्षाची मुलगी त्यांचा गोलु खाडे याच्यापासून बचाव करण्यासाठी आली. याचा राग आल्याने गोलू खाडे याने त्याच्या हातातील ब्लेडने ठाकुर यांना मनगटावर जखमी केले. जयश्री ठाकुर यांच्या मुलीच्या हातातील मोबाईल शाम देविदास खाडे याने घेवून तो बबू खाडे याने जमीनीवर आपटून फोडला. या मारहाणी दरम्यान जयश्री ठाकुर यांच्या गळ्यातील मंगलसुत्राची पोत तुटून कुठेतरी पडली. या घटनेची खबर सौ. ठाकुर यांचे पती शंकर ठाकुर यांनी पोलिसांना कळवल्याचे बघून सर्व मारेकरी पळून गेले. सौ. जयश्री ठाकुर यांना जखमी अवस्थेत अगोदर पारोळा कुटीर रुग्णालयात व नंतर धुळे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला पाचही जणांविरुद्ध विविध कलमानुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here