जळगाव : जळगाव येथून वकीलीचे शिक्षण आणि वकीली व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर टप्पाटप्प्याने यशाची शिखरे गाठत भारत सरकारच्या सक्त वसुली संचालनालयात (ईडी) विशेष सरकारी वकील या पदावर नियुक्ती मिळवलेल्या प्रथितयश वकील संजना शर्मा यांचे रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास मुंबई येथील हिंदुजा हॉस्पीटलमधे दुख:द निधन झाले. जळगाव शहराच्या नवीपेठ परिसरातील राजेश सोमनाथ शर्मा उर्फ बिट्टू भैय्या यांची ती धाकटी बहीण होती. गेल्या काही महिन्यापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.
संजना शर्मा यांनी जळगाव शहरातील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि एलएलएम चे शिक्षण पुर्ण केले. सुरुवातीच्या कालावधीत जळगाव येथील प्रथितयश वकील माधवराव चित्रे यांच्याकडे त्यांनी ज्युनिअर वकील म्हणून कामकाज पाहिले होते. अधिवक्ता संजना सोमनाथ शर्मा यांनी बी.कॉम. एलएलएम सोबतच, सायबर लॉ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन राइट्स आदी अभ्यासक्रम पूर्ण केले होते. सामाजिक क्षेत्रासोबतच विविध कायदेशीर बाबींवरही त्यांची चांगली पकड होती.
काही काळापूर्वी अधिवक्ता संजना सोमनाथ शर्मा यांची भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयात विशेष सरकारी वकील या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयाने 30 एप्रिल 2019 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली होती. विशेष न्यायालयात पीएमएलए खटल्यांमध्ये भाग घेण्यासाठी अधिवक्ता संजना सोमनाथ शर्मा यांची निवड करण्यात आली.
अधिवक्ता संजना सोमनाथ शर्मा यांनी यापूर्वी जळगाव येथे पोलिस विभागात विधी अधिकारी, मुंबईतील सीआयडीमध्ये विशेष सरकारी वकील आणि सीबीआयमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अतिरिक्त विशेष सरकारी वकील या पदावरही काम केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध स्टड फार्म मालक हसन अली असोचा झाकीर नाईक हायप्रोफाईल खटला संजना शर्मा यांनी विशेष सरकारी वकील म्हणून यशस्वीपणे हाताळला होता. त्यांचे परिश्रम आणि क्षमता लक्षात घेत भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयात विशेष सरकारी वकील या पदासाठी नामांकन झाले होते. अॅड. संजना शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या आई श्रीमती कांता शर्मा, भाऊ राजेश शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय, दोन बहिणी वीणा, कल्पना आदी आहेत. संजना शर्मा यांच्या पार्थिवावर रविवारी २२ ऑक्टोबर रोजी मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले.