नारळपाणी विक्रेत्याची डॉक्टरला मारहाण, वाहनाचे नुकसान

जळगाव : रुग्णाचे ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला कार पार्कींग करण्यास मज्जाव करण्यासह मारहाण आणि कारचे नुकसान करणा-या नारळपाणी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनीक रस्त्यावरील विक्रेते आपल्याच मालकीची जागा असल्याच्या थाटात वागत असल्याचे या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. वाहन पार्कींग करण्यास वाहनधारकांना मज्जाव करुन ते दादागिरी करत असल्याचे उघड झाले आहे.     

जळगाव शहरातील डॉ. निरज छगन चौधरी यांचा प्रताप नगर परिसरात नित्यसेवा हॉस्पीटल या नावाने दवाखाना आहे. आज 29 ऑक्टोबरच्या सकाळी पांडे चौकातील निलकमल हॉस्पीटल येथे एका रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी ते आपल्या सहकारी डॉक्टरांसह त्यांच्या कारने ते आले होते. त्याठिकाणी त्यांना एका नारळ पाणी विक्रेत्याने त्याठिकाणी कार उभी करण्यास मज्जाव केला. नारळ पाणी विक्रेता आणि डॉक्टरांमधे शाब्दिक बाचाबाची झाली. हा सार्वजनीक रस्ता आहे. दुसरीकडे गाडी लावण्यास जागा नाही. तुला तक्रार करायची असल्यास पोलिसांकडे कर असे म्हणत डॉक्टर आपल्या सहका-यांसह ऑपरेशन करण्याकामी दवाखान्यात निघून गेले.

त्यानंतर नारळपाणी विक्रेत्याने डॉ. निरज चौधरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार डॉ. चौधरी यांना समजल्यानंतर ते खाली आले. यावेळी दोघे जण डॉक्टरांच्या अंगावर धावून आले. एकाने त्यांची कॉलर पकडली. डॉक्टरांचा बचाव करण्यासाठी दवाखान्यातून दोघे सहकारी डॉक्टर धावून आले. तेव्हा त्यांना देखील मारहाण करण्यात आली.

नारळ कापण्याच्या कोयत्याच्या हल्ल्यात सहकारी डॉक्टर मंगेश दांगोडे यांच्या हाताला जखम झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला. त्याचवेळी एक महिला आरडाओरड करत डॉ. निरज चौधरी यांना  हाताबुक्क्यांनी मारहाण करु लागली. टोके आडनावाच्या डॉक्टरांनी पोलिस स्टेशनला फोन करुन या घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर आलेल्या पोलिस पथकाने पुढील कारवाईला सुरुवात केली. अर्जुन राठोड, सोनु चव्हाण आणि शिल्पा राठोड अशा तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here