जळगाव : कामावर जाण्याची घाई असतांना हॉटेलची मिसळ देण्यास उशीर होत असल्याच्या कारणावरुन हॉटेल मालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसन शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या घटनेप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नावेद शेख खलील या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याला कामावर जाण्याची घाई होती. कामावर जाण्यापुर्वी मिसळ खाण्यासाठी नावेद हा दत्तू चौधरी यांच्या हॉटेलमधे गेला. मात्र मिसळसाठी होत असलेला उशीर बघून त्याने लवकर मिसळ हवी असा आग्रह धरला. नावेद शेख याच्या बोलण्याचा राग आल्याने रविंद्र महादू चौधरी, कैलास नाना महानुभव आणि दिपक वारे आदींनी नावेद शेख खलील यास शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.
आपल्या मुलाला होत असलेली मारहाण बघून नावेद याची आई वाद सोडवण्यास आली. त्याच्या आईला देखील तिघांनी शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या अशी धमकी नावेद व त्याच्या आईला मिळाली. या घटनेप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी रविंद्र महादू चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नावेद शेख खलील, नजीरा शेख खलील आणि खलील शेख शब्बीर आणि नावेद शेख याचा भाऊ अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॉटेलवर गर्दी असल्यामुळे थोडे थांबावे लागेल असे नावेद यास सांगण्यात आले होते. मात्र आपल्या बोलण्याचा नावेद यास राग आल्याने त्याने आपल्याला शिवीगाळ केल्याचे रविंद्र चौधरी यांनी म्हटले आहे. नावेद याच्या आई आणि खलील शेख शब्बीर या दोघांनी आपल्याला चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप रविंद्र चौधरी यांनी केला आहे. दोघा परस्पर विरोधी गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलिस उप निरीक्षक सहदेव घुले करत आहेत.