पोलीस कल्याण निधीत रक्कम जमा करण्याचे निर्देश
मुंबई : प्रियकराविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंद करणाऱ्या महिलेस उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सदर महिलेस २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून ती दंडाची रक्कम पोलिस कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.आपल्याला हे प्रकरण पुढे चालवायचे नाही असे म्हणत महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
प्रियकराविरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्यासंदर्भात न्या. आर. डी. धानुका तसेच न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने संबंधित महिलेस २५ हजार रुपये दंड आकारला आहे. ही दंडाची रक्कम चार आठवड्याच्या आत महाराष्ट्र पोलीस कल्याण निधीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रियकराने ड्रग्स घेऊन बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मागील महिन्यात महिलेने तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंबातील सदस्यांच्या दबावामुळे आपण ही खोटी तक्रार दाखल केल्याचे तिने म्हटले.