जळगावचे व्यावसायीक अजय ललवाणीसह चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

जळगाव : इच्छापत्रात असलेल्या मिळकतीच्या हिश्श्यात बदल करून त्यावर मयत इसमाची बनावट स्वाक्षरी व अंगठा लावून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली संशयित जयेश मुकेश ललवाणी, रोहन मुकेश ललवाणी (दोघे रा. शिरसोली रोड) राजेश शांतीलाल ललवाणी (रा. जयनगर) व अजय शांतीलाल ललवाणी (रा. शिरसोली रोड) अशा चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्किटेक्ट दिलीप आनंदा कोल्हे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

जळगावच्या मौजे मेहरूण शिवारात 464/1 मध्ये फिर्यादीसह राजेश ललवाणी, कै. मुकेश शांतीलाल ललवाणी (दोघे रा. जयनगर) व श्रीराम गोपालदास खटोड अशा चौघांनी मिळून दि. 13 नोव्हेंबर 2001 रोजी अदलाबदल खत दस्त क्र. 6351 नोंदणीकृत दस्तान्वये घेतली आहे. यापैकी मुकेश ललवाणी हे 5 ऑक्टोबर 2020 रोजी मयत झाले आहेत. दिलीप कोल्हे यांना मुकेश ललवाणी यांचे इच्छापत्र 15 जून 2021 या तारखेला मिळाले.

इच्छापत्रातील जयेश ललवाणी व रोहन ललवाणी यांनी त्या मिळकतीची विभागणी केली. त्या मिळकतीवर साक्षीदार म्हणून राजेश ललवाणी व अजय ललवाणी यांच्या सह्या आहेत. आर्कीटेक्ट दिलीप कोल्हे यांनी कागदपत्रांची तीन हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केली. त्या तपासणीत सही व अंगठा खोटा असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. इच्छापत्राच्या आधारे संबंधित तलाठी यांनी मयत मुकेश यांचे वारस म्हणून जयेश व रोहन ललवाणी यांच्या नावाची नोंद उताऱ्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले. या दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here