जळगाव : शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मुलीला सोबत घेऊन जाणा-या मोटार सायकलस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला अज्ञात मोटार सायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाळ उत्तम माळी (रा. लोहीया नगर चोपडा) असे मरण पावलेल्या मोटार सायकल चालकाचे नाव आहे.
गोपाळ माळी व त्यांची मुलगी करुणा माळी असे दोघे बाप लेक चोपडा येथून धुळे येथे कथा वाचक प्रदिप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मोटार सायकलने जात होते. चोपडा ते अमळनेर मार्गे धुळे येथे जातांना वेले गावानजीक जिनींगच्या अलिकडे हा अपघात झाला. वळणरस्त्यावर निमगव्हाण गावाकडून चोपडा शहराच्या दिशेने भरधाव वेगात जाणा-या अज्ञात मोटार सायकलस्वाराने दिलेल्या धडकेत गोपाळ माळी हे ठार झाले. मोटार सायकल क्रमांक एमएच 19 डीटी 4112 याच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे.कॉ. प्रदीप राजपूत पुढील तपास करत आहेत.