नेतागिरी करणारा प्रविण पाटील होता घरफोड्या — पोलिसांनी ठोकल्या त्याच्या हातात जेलच्या बेड्या

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र पोलिसांबद्दल जनतेच्या मनात विविध मतप्रवाह आहेत.  त्यांना बऱ्याच वेळा खलनायक स्वरुपात पाहिले जाते. पण ते सत्य नसल्याचे जळगाव पोलीस दलाने अनेक तपास कामातून दाखवून दिले आहे. सुमारे 36 ते 38 लाख लोकसंख्येचा जळगाव जिल्हा असून एकट्या जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखाच्या वर आहे. जळगाव शहर व जिल्ह्यात टू व्हीलर, फोर व्हीलरचा जणू सुळसुळाट झाला आहे. प्रत्येकाचा कामधंदा वेगवेगळा आहे. जळगाव जिल्ह्यातील एका अफलातून चोराने ग्रामीण विभागातून चो-या आणि घरफोड्यांचा जणू सपाटाच लावला होता. फोर व्हीलर म्हणजे आलिशान गाडी समजली जाते. ग्रामीण भागातील लोक या चारचाकी वाहनातून हिंडू लागले की गावकरी त्यांच्याकडे सन्मानाने बघतात.

अनेक चो-या घरफोड्या करणारा आणि विशेष म्हणजे सरपंचपदाच्या शर्यतीत सहभाग घेऊन हरणा-या एका चोरट्याचा बुरखा जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने टराटरा फाडून त्याचा भंडाफोड केला आहे. प्रविण सुभाष पाटील असे जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घरफोड्याचे नाव आहे. ज्या ज्या भागात घरफोड्या झाल्या त्या त्या भागात त्याची चारचाकी आणि चारचाकीवरील लोगो सीसीटीव्हीत हमखास आढळून आल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. “तो मी नव्हेच” अशी भुमिका घेणा-या पांढ-या शुभ्र कपड्यातील नेत्याची मस्ती पोलिसांनी जिरवून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर आणला आहे. गुन्हेगाराचा छडा लावायचेच म्हटल्यावर कसे काम होते ते जळगाव एलसीबीने दाखवून दिले आहे.

ग्रामपंचायत निवडणुका काही महिन्यांपुर्वी आटोपल्या. या निवडणूकांची धामधूम आता संपली. जळगाव तालुक्यातील बिलवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने प्रवीण पाटील या उमेदवाराने स्वतःचे पॅनल उभे करून निवडणूक लढवली. काही वर्षांपूर्वी आपल्या नजरेसमोर भटकणारा बेरोजगार प्रवीण पाटील हा पैशांची उधळण करतांना स्थानिक लोक बघू लागले.  स्वतः सरपंच होण्यासाठी त्याने रातोरात सुमारे बारा लाख रुपये वाटप केल्याचे लोक बोलू लागले. त्यामुळे साहजीकच त्याच्याकडे एवढी धनसंपत्ती कुठून आली हा बिलवाडी गावात एक चर्चेचा विषय झाला. लाखो रुपये मतदारांना वाटून देखील तो सरपंचपदाची निवडणूक हरला. तरी देखील त्याच्या चेह-यावर कुठलाही गम पस्तावा गावक-यांना दिसला नाही. प्रविण सुभाष पाटील याचा निवडणूकीपुर्वीचा तोच रुबाब गावक-यांच्या नजरेस पडला. 

दरम्यानच्या कालावधीत पाचोरा पोलिस स्टेशनला घरफोडीचा एक गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरु होता. या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना एकाच क्रमांकाचे चारचाकी वाहन विविध ठिकाणी सिसीटीव्ही फुटेजमधे एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पाहण्यात आले. हे संशयास्पद वाहन नेमके कुणाचे आहे याची माहिती घेतली असता ते बिलवाडी येथील सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रविण सुभाष पाटील याचे असल्याची माहिती पुढे आली.

बिलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीपुर्वी बेरोजगार असलेला प्रविण पाटील याने ग्रामपंचायत निवडणूकीत लाखो रुपये उधळल्याची माहिती पोलिसांच्या लक्षात आली होती. सामाजिक कामाच्या नावाखाली त्याने ‘देवा’ या नावाचा एक ग्रुप तयार केला होता. अनेक तरुण त्याच्या संपर्कात होते. हळूहळू घरफोड्यांच्या गुन्ह्याची सुई प्रविण पाटील याच्याभोवती स्थिरावत होती. त्याची गुन्हेगारी कुंडली काढण्यास पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी काढण्यास सुरुवात केली.  

दोन दिवस पाळत ठेवल्यानंतर अखेर प्रवीण पाटील यास ताब्यात घेण्यात आले. पोलीस म्हणजे, किरकोळ असा दुराग्रह झाल्याने त्याने आलेल्या पोलिस पथकाला आपला रुबाब दाखवण्यास सुरुवात केली. मी राजकीय व्यक्ती असून माझ्याकडे सर्वकाही मुबलक प्रमाणात आहे. माझ्याकडे स्वत:चे घर, गाडी आणि संपत्ती असून मी सरपंच पदाच्या शर्यतीत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. एवढे सगळे असतांना मी घरफोड्या कशासाठी करेन? असा उलट प्रश्न त्याने पोलिसांना केला. मात्र त्याच्याविरुद्ध असलेले एकेक पुरावे पाहिल्यानंतर आणि पोलिसी खाक्या बघून त्याने आपले गुन्हे कबुल केले. त्याने एक नव्हे, दोन नव्हे, तिन नव्हे तर विस घरफोड्या केल्याचे पोलिसांजवळ कबुल केले.

त्याने दिलेल्या कबुलीनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव ग्रामीण, मेहुणबारे, पारोळा, एरंडोल, कासोदा, जामनेर, भडगाव, भुसावळ तालुका, अमळनेर आदी गावांना केलेल्या विस घरफोड्यांची उकल झाली. त्याच्यकडून 9 लाख 39 हजार 691 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लगड, गुन्ह्यात वापरलेली 10 लाख रुपये किमतीची सुझुकी स्विफ्ट कार, 90 हजार रुपये किमतीची पल्सर मोटार सायकल असा एकुण 20 लाख 29 हजार 691 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सुरुवातीला पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याच्या तपासकामी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याने कबुल केलेल्या प्रत्येक पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे त्याने एकट्यानेच केले आहेत. कोणत्याही गुन्ह्यात त्याने कुणालाही सहभागी केलेले नाही. आपण एकट्याने गुन्हा केला म्हणजे आपल्यावर कुणाचा संशय येणार नाही असा त्याने समज केला होता. तसेच ज्या गावांना त्याचे नातेवाईक रहात होते त्या गावांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त गेल्यानंतर तो रेकी करुन रात्री गुन्हे करत होता. घरफोड्या करुन त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि सरपंच पदाचे स्वप्न पाहिले. मात्र झाले उलटेच. घरफोड्यांच्या पैशांवर ‘गाव पाटीलकी’चा रुबाब त्याला चांगलाच महागात पडला. पांढरा शुभ्र सदरा-पायजमा, चकचकीत कार आणि अंगात पुढारी बाणा अंगीकारलेल्या अट्टल घरफोड्याला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तोच तोरा त्याने पोलिसांना दाखवला. पण पोलिसांची ‘पाटीलकी’ या भामट्यावर भारी पडली अन्‌ घडा उलटा करावा तसा त्याला उलटा करताच गुन्ह्यांची सरबत्तीच लागली.

तो एकामागून एक घरफोडी करत गेला, त्यातून त्याने बक्कळ पैसा कमावला आणि याच पैशांच्या जोरावर तो गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक लढला. याच चोरीच्या पैशातून त्याने कार आणि मोटार सायकल विकत घेतली. पण या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. त्याची अकाली श्रीमंती लपू शकली नाही, पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याच्या हातात बेड्या पडल्या.

जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावाच्या प्रवीण पाटीलने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ मोठे पोस्टर्स लावले होते. या पोस्टरमध्ये पांढरा शुभ्र शर्ट घातलेला. हात जोडून उभा असलेल्या या तरुणाने थेट लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली. या निवडणुकीत तो 48 मतांनी पराभूत झाला. निवडणुकीसाठी त्याने लाखो रुपये खर्च केले.

काही वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात राहणारा एक सरपंच मोटरसायकलने जळगावला येऊन येथील लोकांच्या मोटरसायकली चोरत असे. एवढेच नव्हे तर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातला एक नोकरनामी चोर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अशीच एक मोटर सायकल लांबवताना पकडला होता. त्याने 30 गाड्या लांबवल्या होत्या. त्यालाही पकडणारे जळगाव पोलीसच. अलीकडे अशा काही चोरांची आर्थिक ताकद वाढल्याने ते आता पांढरे स्वच्छ कपडे, सोन्याचे ब्रेसलेट, अंगभर दागिने मिरवू लागले आहेत. संपत्ती प्रदर्शनातून सरपंच पद मिळाले की कालचा चोर बनलाच शहाजोग. त्यालाच लोक मग दादा – दादा म्हणून डोक्यावर घेतात. असे गल्ली दादा गावोगाव आहेत. दादा म्हणून वावरणारे सारेच तसे नसले तरी जळगाव जिल्ह्यात चार चाकीतून रुबाबात फिरून चोरी करणारा बिलवाडी ग्रामपंचायत सरपंच पद हरलेला हा गडी नक्कीच चोरांच्या दुनियेतील अफलातून म्हणायला हवा.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here