पिस्टलचा धाक दाखवत चालकाचे अपहरण, माल भरलेल्या वाहनाची चोरी

जळगाव : पिस्टलचा धाक दाखवत दोघांनी कुरियर पार्सल कंपनीच्या वाहनावरील चालकाचे अपहरण तसेच त्याच्या ताब्यातील मालाने भरलेल्या वाहनाची चोरी केल्याच्या घटनेप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील एकास अटक करण्यात आली आहे.

विनोद महारु पाटील हा कुरियर पार्सल कंपनीच्या वाहनावरील चालक आहे. त्याच्या ताब्यातील बोलेरो वाहनाने तो ग्राहकांच्या विविध किमती वस्तूंच्या पार्सल पाकीटांचा माल कचोलीवाला हाफ सुरत येथे रिकामा करण्यासाठी जात होता. वाटेत आकाश गोरख सोनवणे आणि आकाश विठ्ठल कोळी या दोघांनी पिस्टलचा धाक दाखवत चालक विनोद पाटील याच्या ताब्यातील मालाने भरलेले वाहन आपल्या ताब्यात घेतले. चालक विनोद पाटील याचे अपहरण करुन वाहनाची चोरी केली.

13 लाख 97 हजार रुपये किमतीचा माल आणि 5 लाख रुपये किमतीचे वाहन, एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण 18 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील आकाश विठ्ठल कोळी यास अटक करण्यात आली असून आकाश गोरख सोनवणे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आकाश सोनवणे आणि आकाश कोळी हे दोघे रिधुर पोस्ट इदगाव ता. जळगाव येथील मुळ रहिवासी असून सुरत येथे राहतात. चालक विनोद पाटील हा एरंडोल तालुक्यातील मालखेडा येथील मुळ रहिवासी असून उधना सुरत येथे राहण्यास आहे. वकताना सुरत आणि कोळंबा ता. चोपडा या ठिकाणी घडलेल्या या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. एस. एल. नितनवरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here