वादग्रस्त भाडोत्री वाहनाचे फुटले बरेच खापर — जिल्हाधिका-यांनी केला जुन्या वाहनाचा वापर

                   

जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी वापरत असलेल्या चारचाकी वाहनाची माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी सखोल माहिती घेतल्यानंतर त्यात बरेच वादग्रस्त मुद्दे जनतेच्या समोर आले. एमएच 19 ईए 8429 हे वाहन मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरल्यानंतर आता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ते वाहन वापरणे सोडून आता पुर्वीचेच एमएच 19 एम 0101 हे वाहन वापरण्यास सुरुवात केली आहे. ज्या उत्साहात जिल्हाधिकारी महोदयांनी नवे वाहन वापरण्यास सुरुवात केली होती तो उत्साह फार दिवस तग धरु शकला नाही. अखेर त्यांना पुर्वीचेच शासकीय आणि अधिकृत वाहन वापरण्याची वेळ आली आहे.

एमएच 19 ईए 8429 या भाडोत्री म्हणून वापरण्यास देणा-या वाहन मालकाकडून 12 हजार 244 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यात 2244 रुपयांचा परमिट टॅक्स आणि खासगी वाहन विनापरवाना भाडे तत्वावर वापरण्यास दिले म्हणून 10 हजार रुपये दंड असा एकुण 12 हजार 244 रुपयांचा हा दंड आहे. वाहन एकाचे, भाड्याने देणारा दुसरा, भाड्याने घेणारा तिसरा आणि वापरकर्ता चौथा अशी या वाहनाची गत झाली होती. या वादग्रस्त एमएच 19 ईए 8429 या वाहनाच्या मुळ मालकास प्रभारी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुनिल गुरव यांनी नोटीस जारी केली होती. भुसावळ येथील आक्स इरेक्टोरर्स प्रा.लि. मु.पो. कस्तुरी प्लेस विकली मार्केट भुसावळ यांच्या नावे ही नोटीस जारी करण्यात आली होती. सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या वाहनाची सखोल माहिती संकलीत केल्यानंतर सत्यता जनतेसमोर येण्यास सुरुवात झाली.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कालपर्यंत लाल दिवा लावून वापरत असलेल्या  एमएच 19 ईए 8429 या वाहनाची खासगी संवर्गात नोंदणी झाल्याचे आढळून आले होते. असे असतांना देखील मेसर्स दिया कार औरंगाबाद यांनी हे वाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव यांना भाडे तत्वावर दिले होते. तशी तक्रार सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्राप्त झाली होती.  परिवहन कार्यालयाने या वाहनाचे अभिलेख तपासले असता हे वादग्रस्त वाहन आक्स इरेक्टोरर्स या मालकीच्या नावे नोंदणी आढळून आली होती. हे वाहन कोणत्या आधारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास भाडे तत्वावर दिले? असा प्रश्न वाहन मालकास विचारण्यात आला होता. या वादग्रस्त वाहनाचा  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आता वापर बंद केला आहे. एवढेच नव्हे तर या शासकीय वाहनावरील लाल दिवा देखील नाहीसा झाला आहे.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here