विवाहीत बुधीबाईची दोघांसंगे जमली प्रेमाची जत्रा! — चिडलेल्या अर्जुनने संपवली अफजलची जीवनयात्रा

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल ही दोन्ही तालुके केळी उत्पादनाची प्रमुख तालुके समजले जातात. या भागातील शेतक-यांचे केळी हे प्रमुख पिक आहे. यावल आणि रावेर तालुक्यातील केळीचे उत्पादन रावेर, सावदा, निंभोरा आणि भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन देशाच्या विविध भागात रवाना केले जाते. जळगाव जिल्ह्यातील सावदा, रावेर, निंभोरा, ऐनपूर आदी गावे प्रमुख आणि सधन गावे समजली जातात.

रावेर तालुक्याच्या निंभोरा पोलिस स्टेशन अंतर्गत ऐनपूर या गावी  शेख अफजल शेख अस्लम हा तरुण व्यावसायीक रहात होता. म्हशींची खरेदी विक्री हा त्याचा व्यवसाय होता. म्हशी खरेदी करुन त्यांची गुरांच्या बाजारात विक्री करणे असा त्याचा व्यवसाय होता. या व्यवसायातून त्याला चांगल्या प्रकारे मिळकत सुरु होती. त्यामुळे त्याच्या खिशात पैसा खुळखुळ करत होता.  

शेख अफजल रहात असलेल्या ऐनपूर याच गावात एक विवाहीता रहात होती. बुधीबाई भिल असे त्या महिलेचे नाव होते. बुधीबाई भिल ही विवाहीता असली तरी देखील अफजल हा तिच्या रुपावर भाळला होता. त्याला बुधीबाईचे प्रणयी रुप स्वस्थ बसू देत नव्हते. बुधीबाईचे तारुण्य बघून अफजल जणू चेकाळला होता. रात्रंदिवस त्याच्या नजरेसमोर बुधीबाईचा चेहरा येत होता. स्वप्नात देखील त्याला बुधीबाईचा चेहरा दिसत असे. बुधीबाईच्या रुपावर तो जणू काही जीव ओवाळून टाकत होता. काहीही करुन बुधीबाईला आपल्या नादी लावायचे असे त्याने मनाशी ठरवले होते. त्यानुसार तो नियोजन करत होता. त्याच्या खिशात पैसे खुळखुळ करत होते. त्या पैशांच्या जोरावर त्याने बुधीबाईवर प्रेमाचे फासे टाकण्यास सुरुवात केली. त्यात तो लवकरच यशस्वी झाला. अखेर एके दिवशी बुधीबाई त्याच्याकडे बघून हसली आणि त्याच्या प्रेमजाळ्यात फसली.

काही दिवसांनी गावातील अजून एक जण बुधीबाईच्या रुपावर भाळला. तो देखील बुधीबाईवर आपले प्रेमाचे फासे फेकू लागला. एक सोडून दोन जण आपल्या रुपावर जीव ओवाळून टाकत असल्याचे बघून बुधीबाई भलतीच फॉर्मात आली. ती दोघांना झुलवू लागली. दोघे दिलफेक आशिक आपल्या रुपावर लट्टू होत असल्याचे बघून  बुधीबाई दोघांना वेगवेगळ्या वेळेस भेटू लागली. दोघांना भेटण्याचे नियोजन करण्यात ती पारंगत झाली. पती सोबत असला म्हणजे ती कुणालाही भेटत नव्हती. पतीच्या गैर हजेरीत ती दोघा प्रेमींना वेगवेगळ्या जागेवर भेटून त्यांच्या स्पर्श सुखाचा अनुभव घेत होती. 

धन्नाशेठ असलेला अफजल हा बुधीबाईला लपून छपून भेटत होता. तिला चांगले चांगले खायला देत होता. दोघे एकमेकांना भेटले म्हणजे तो तिला कधी मिठाई तर कधी पाणीपुरी खायला देत असे. त्यातून पतीपेक्षा तिला अफजल प्रेमाचा आणि जवळचा वाटत होता. वास्तविक बुधीबाई ही एक विवाहीता होती. तिला तिचा संसार होता. तिला तिचा पती होता. तरीदेखील ती अफजलच्या प्रेमात फसली होती. अफजल देखील तिला जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तिला काय हवे काय नको याची तो आवर्जून काळजी घेत होता. पतीपेक्षा प्रेमी अफजल आपली अधिक काळजी घेत असल्याचे बघून ती साहजीकच त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले. दोन भिन्नलिंगी जीव एकमेकांच्या बाहुपाशात येण्यास वेळ लागला नाही.

एके दिवशी या गोष्टीची भनक बुधीबाईचा पती अर्जुन भिल याला लागली. आपली पत्नी बुधीबाई ही अफजलच्या नादी लागल्याचे बघून त्याला चिड आली. केवळ अफजलच नव्हे तर ती अजून दुस-याच्या देखील नादी लागल्याचे बघून त्याला दोघांचा भलता राग आला. संतापलेल्या अर्जुनने एके दिवशी अफजल यास बोलावून खडे बोल सुनावले. “तु हे रिकामे धंदे करु नको” अशा कडक शब्दात अर्जुन भिल याने अफजल यास सुनावले.

अर्जुनचा राग बघून अफजल शांत बसला. मात्र त्याच्या मनात बुधीबाई बसली आणि वसली होती. बुधीबाईला स्पर्श करण्याची त्याला जणू चटकच लागली होती. त्यामुळे अर्जुनच्या रागावण्याचा आणि दरडावण्याचा अफजलच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. तो बुधीबाईची चोरुन लपुन भेट घेत तिच्या दोन्ही हातांना स्पर्श करतच होता.

आपण करड्या भाषेत समजावून देखील अफजल समजण्यापलीकडे गेल्याचे अर्जुन भिल याच्या लक्षात आले. त्यामुळे अफजलसह तिचा दुसरा प्रेमी अशा दोघांचा कायमचा काटा काढण्याचे अर्जुन भिल याने मनाशी ठरवले. त्या दृष्टीने तो तयारीला लागला. त्याने बुधीबाईला दोघांना फोन करुन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावण्यास सांगितले. पती अफजल याच्या सांगण्यानुसार बुधीबाईने अफजल यास निंबोल शिवारातील शेतात आणि दुस-या प्रेमीस घरी येण्याचा निरोप दिला. अफजल हा त्या दिवशी गावातच असल्यामुळे तो बुधीबाईला भेटण्यासाठी निंबोल शिवारात येण्यास तयार झाला. तिचा दुसरा प्रेमी बाहेरगावी असल्यामुळे तो तिला भेटण्यास येणार नसल्याचे स्पष्ट झाले. वास्तविक बुधीबाईच्या निरोपाच्या माध्यमातून तिच्या प्रेमींना बोलावून त्यांचा कायमचा काटा काढण्याचे अर्जुन भिल याचे नियोजन होते. दोघांना ठार करण्याचे आपल्या मनातील नियोजन त्याने बुधीबाईला समजू दिले नाही. केवळ दोघांना समजावण्यासाठी बोलावत असल्याचे त्याने बुधीबाईला सांगितले.  

बुधीबाईने आपल्याला बोलावले असे समजून अफजल हा निंबोल शिवारातील गायरान शेताकडे मोटार सायकलने आला. त्यावेळी बुधीबाई तेथे नव्हती. त्याठिकाणी तिचा पती अर्जुन भिल हा लपून बसला होता. अफजल समोर येताच अर्जुन सावध झाला. बुधीबाईच्या जागी तिचा पती अर्जुन समोर आल्याचे बघून अफजल काहीसा बिथरला. सुरुवातीला अर्जुन आणि अफजल या दोघांची शाब्दिक चकमक झाली. शब्दामागे शब्द वाढत गेला. संतापात असलेल्या अर्जुनने त्याच्याजवळ असलेल्या बांबूच्या (टोकराच्या) दांड्याने अफजलच्या डोक्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अफजल जीवानिशी ठार झाला. अफजल ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्जुन भिल घटनास्थळावरुन फरार झाला. आपण अफजल याचा खून केल्याचे त्याने बुधीबाईला सांगितलेच नाही. बुधीबाईला घेऊन तो आपल्या मुळ गावी मध्यप्रदेशात निघून गेला.

काही वेळाने मयत अफजल याचा एक नातेवाईक तरुण त्या गायरान शेतात कामानिमीत्त आला. त्यावेळी त्याला अफजल हा मोटार सायकलच्या खाली दबलेल्या अवस्थेत निपचीप पडून असल्याचे दिसले. त्याने अफजलच्या अंगावरील मोटार सायकल उचलून बाजुला उभी केली. अफजल यास हलवून पाहिले असता तो मरण पावला होता. त्याने लागलीच फिरोज खान मोहम्मद खान या चिकन विक्रेता असलेल्या नातेवाईकाला या घटनेची माहिती दिली. बघता बघता सर्व नातेवाईकांना या घटनेची माहिती समजली. मयत अफजल याचे सर्व नातेवाईक घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळी शेख अफजल हा मरुन पडलेला होता. त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबर मार लागून रक्त सांडलेले होते. घटनास्थाळावरील नातेवाईकाने अफजल याच्या मोबाईलवर कॉल लावला असता तो लागत नव्हता. त्यामुळे कुणीतरी त्याचा घातपात केल्याची जमलेल्या सर्व नातेवाईकांची खात्री झाली.

या घटनेची माहिती समजताच निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजनपाटील असे आपापल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दाखल झालेल्या पोलिस पथकाने पुढील कायदेशीर कारवाईला आणि तपासाला सुरुवात केली. या घटने प्रकरणी चिकन विक्रेता फिरोज खान मोहम्मद खान याने दिलेल्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलिस स्टेशनला शेख अफजल शेख असलम याच्या हत्येप्रकरणी  अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.नं. 214/23 भा.द.वि. 302 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे पो.नि. गणेश धुमाळ यांनी आपल्याकडे घेतला. त्यानंतर काही दिवसातच त्यांची बदली झाली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी केलेल्या घटनास्थळ पाहणी दरम्यान मिळालेले पुरावे तसेच गोपनीय माहितीनुसार मयत अफजल याचे गावातील बुधीबाई भिल या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे अधिक तपासाअंती तांत्रीक विश्लेषण करण्यात आले.

तांत्रीक विश्लेषणानुसार या गुन्ह्यात बुधीबाई भिल या महिलेचा पती अर्जुन नरसिंग भिल याचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन भिल याचा शोध घेतला असता तो त्याची पत्नी बुधीबाई भिल हिच्यासोबत परगावी निघून गेल्याचे समजले. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मध्य प्रदेशात आदिवासी तांड्यावर वेश बदलून रवाना करण्यात आले. सलग चार दिवस एलसीबी पथकाने अर्जुन भिल याचा शोध घेतला. अखेर त्याचा शोध लागला आणि त्याला माफिपालीया पाडा पोस्ट धुलकुट ता. नेपानगर जिल्हा बुरहानपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबुल केला. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार केवळ बुधीबाईचा पती अर्जुन भिल हा संशयीत आरोपी निष्पन्न झाला. त्यानंतर काही दिवसांनी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांची बदली झाली.

त्यानंतर पोलिस स्टेशनचा चार्ज घेतलेले नवनियुक्त सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सखोल तपास सुरु केला. या तपासाअंती बुधीबाईला देखील संशयीत आरोपी करण्यात आले. तिने दिलेल्या माहितीनुसार तिचे केवळ अफजल सोबत अफेअर नव्हते तर गावातील अजून एका सोबत देखील अफेअर होते. मात्र तिचा दुसरा प्रेमी त्यादिवशी गावात नव्हता. त्यामुळे तो अर्जुन यास भेटण्यास आला नाही आणि त्याचा जीव वाचला. नशीब बलवत्तर म्हणून बुधीबाईचा दुसरा प्रेमी जीवानिशी वाचला.

मयत अफजल शेख याचे आपली पत्नी बुधीबाई हिच्यासोबत असलेल्या चारित्र्याच्या संशयातून आपण त्याची हत्या केल्याचे अर्जुन भिल याने कबुल केले. आपण अफजल यास समजावले होते. मात्र अफजल ऐकण्याच्या तयारीत नव्हता असे अर्जुन भिल याने पोलिसांना कथन केले.  त्या रागातून अर्जुन भिल याने बुधीबाईच्या माध्यमातून अफजल यास ऐनपुर गावातील गायरान रस्त्यावरील शेताकडे बोलावले. अफजल हा मोटार सायकलने एकटाच आला. त्यावेळी अर्जुन याने त्याच्याजवळ असलेल्या जाड बांबूच्या (टोकराच्या) दांड्याने अफजलच्या डोक्यावर मारुन त्याला जीवे ठार केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, हे.कॉ. कमलाकर बागुल, महेश महाजन, दिपक पाटील, नितीन बावीस्कर, संदिप सावळे, श्रीकृष्ण देशमुख, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, राहुल बैसाणे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भारत पाटील तसेच निंभोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक काशीनाथ कोंळबे, पोलिस उप निरीक्षक रा.का.पाटील, हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, रिजवान पिंजारी, सुरेश अढायगे, रावेर पोलिस स्टेशनला डी.बी. इंचार्ज म्हणून बदलून गेलेले हे.कॉ. ईश्वर चव्हाण, किरण जाधव, स्वप्नील पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे व त्यांचे सहकारी रिझवान पिंजारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here