शिवमहापुराण कथेत चोरट्यांनी भरवली शाळा — 38 महिलांच्या अटकेने बसलाच चोरीला आळा  

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): आपले दागिने, मोबाईल, पर्स सुरक्षीत ठेवा, चोरांपासून सावध रहा, आपले दागिने चोरीला जाऊ शकतात. असा सावधानतेचा इशारा बस स्थानकावर गर्दीच्या वेळी हमखास आणि वारंवार दिला जातो. हा सावधानतेचा इशारा वारंवार देऊन सुद्धा अनेक महिला आपले दागिने विशेषत: सोन्याची मंगलपोत घालून प्रवास करतात. 

गेल्या आठवड्यात जळगाव नजीक वडनगरी येथे कथावाचक प्रदिप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा उत्साहात संपन्न झाली. या कथेचे श्रवण करण्यासाठी लाखोंच्या संख्येने महिला भाविक येणार हे जगजाहीर होते. झालेही तसेच. पहिल्याच दिवशी 7 ते 8 लाख महिलांची उपस्थिती या कथेला लाभली. नंतर प्रत्येक दिवशी हा आकडा लाखाच्या घरात वाढत गेला. “जेथे गर्दी तेथे चोर” आणि “जेथे चोर तेथे पोलिस” आणि सर्वात महत्वाचे म्हणजे “जेथे पोलिस तेथील जनता जवळपास भयमुक्त” हे सर्वांना माहिती आहे. आपली सुरक्षा पोलिसांच्या भरोश्यावर सोडून कित्येक महिलांनी आपले किमती दागिने मिरवत कथेच्या स्थळी हजेरी लावली. खुद्द प्रदिप मिश्रा यांनी देखील महिला भाविकांना आपले दागिने सुरक्षित ठेवा, चोरांपासून सावध रहा असा इशारा दिला. मात्र तरीदेखील कित्येक महिला सोन्याचे दागिने घालून कथेचे श्रवण करण्यासाठी आल्या.

ज्याप्रमाणे हिरवेगार कुरण म्हणजे गुरांसाठी यथेच्छ खाद्यपदार्थाचे ठिकाण त्याप्रमाणे गर्दी आणि ती देखील महिलांची म्हणजे चोरांसाठी चोरीचे कुरण अर्थात पर्वणी म्हटली जाते. याच लाखोंच्या संख्येची गर्दी बघून अगदी झकपक वस्त्र प्रावरणे, झकपक साडी ब्लाऊज परिधान करुन चोरट्या महिलांनी देखील पहिल्याच दिवशी हजेरी लावली. कुणाला शंका येणार नाही अशा शुभ्र आणि झकपक  वस्त्रांचा पेहराव करुन चोरट्या महिला कथास्थळी अवतीर्ण झाल्या.

पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी सोन्याची मंगलपोत लांबवणा-या महिलांवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. दररोज वाढत जाणारी लाखोंच्या संखेने महिलांची गर्दी आणि त्या गर्दीत चोरट्या महिलांना हेरणे म्हणजे एक दिव्य कार्य पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केले. यासाठी महिला पोलिसांची विशेष मदत घेण्यात आली. स्थानिक आणि पर राज्यातून चोरट्या महिला येणार असा अंदाज बांधून पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी पर राज्यातील महिला सोनसाखळी चोरांची फोटोसह कुंडली अर्थात माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना हवे तसे यश आले.

नाशिक, धुळे व अन्य राज्यात झालेल्या शिव महापुराण कथांमधे सोनसाखळी लांबवणा-या मध्य प्रदेशातील इंदोर, मंदसोर आदी गावातील चोरट्या महिलांना पकडण्यात यश आले. पहिल्या दिवशी 27 नंतर 10  अशा एकुण 38 चोरट्या महिलांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काही प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या चोरट्या महिलांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या हेमलता प्रकाश भावसार, सरोज पुरुषोत्तम जोशी व मंगलाबाई प्रकाश कोळी यांना वडनगरी फाट्यानजीक 20 ते 22 चोरट्या महिलांनी घेराव घालून धक्काबुक्की सुरु केली. या तिघा महिलांच्या गळ्यातील एकुण 96 हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या जबरीने तोडून घेतल्या होत्या. या घटनेप्रकरणी हेमलता भावसार यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या चोरट्या महिलांच्या ताब्यातून धारदार ब्लेड आदी वस्तू देखील हस्तगत करण्यात आल्या. पहिल्य दिवशी 27 व दुस-या दिवशी 10 अशा एकुण 38 जणींना ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांविरुद्ध चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टींग अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. या कारवाई नंतर इतर चोरट्यांच्या गोटात खळबळ माजली आणि पुढील संभाव्य गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईबद्दल स्वत: आयजींनी दखल घेत पथकाला बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. अटकेतील महिलांना नंतर पुढील कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नयन पाटील करत आहेत. पाच दिवस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर या महिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

दररोज किमान चार ते पाच सोनसाखळी चोरण्याचे उद्दीष्ट घेऊन प्रत्येक महिला या कथेला आली होती. मात्र कथेच्या सुरुवातीच्या कालावधीतच या टोळीला पकडण्यात आल्याने सोनसाखळी चोरीचे प्रमाण आटोक्यात आले. दानशुरांच्या बळावर कथेच्या ठिकाणी जेवण, नाश्ता, चहा, पाणी, राहण्याची व्यवस्था आदी मोफत असल्यामुळे चोरट्यांना आयती संधी मिळाली होती. त्या कथेच्या मंडपातच मुक्कामी राहून या महिला आपले चोरीचे उद्योग करत होत्या. या चोरट्या महिलांचे राहणीमान श्रीमंत महिलांना लाजवेल असे असल्यामुळे त्या चोरट्या महिला असतील हे कुणाला खरे वाटत नव्हते. त्यासाठी महिला पोलिसांच्या मदतीने पुढील कारवाई करण्यात आली.  सुरुवातील एक चोरटी महिला पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर तिने कबुली दिली. आपल्या चोरट्या सहकारी महिला गर्दीत विखुरल्या असल्याचे तिने कबुल केले. त्यामुळे लाखोंच्या गर्दीतून देखील या महिलांना हुडकून काढण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यानंतर दररोज मंडपात खडा पहारा देऊन गस्त वाढवण्यात आली. त्यामुळे देखील चोरीला आळा बसला. दिवसागणीक महिला भाविकांची लाखोंच्या संखेने वाढत जाणारी गर्दी असली तरी सोनसाखळी चोरीवर नियंत्रण बसले हे नक्की.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत, सहायक फौजदार अनिल जाधव, जितेंद्र पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, संदिप पाटील, दिपक पाटील, प्रमोद लाडवंजारी, प्रविण मांडोळे, योगेश वराडे, महिला पोलिस अंमलदार शोभा न्याहळदे, रत्ना मराठे, अभिलाषा मनोरे, वैशली सोनवणे, अश्विनी सावकारे, चालक पोलिस अंमलदार महेश सोमवंशी आदींनी या कारवाईत महत्वाची भुमिका बजावली.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here