फैजपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अजून नवीन?- — कार्यकर्ता इंगळे करतात तक्रारी नव-नवीन !!   

जळगाव :  यावल तालुक्यातील फैजपूर परिसरात सट्टा जुगार व्यवसाय जोमात असल्याचे वृत्त “क्राईम दुनिया” ने ठळक स्वरुपात प्रसिद्ध केल्यानंतर वाचकांनी या वृत्ताचे भरभरुन स्वागत केले. फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश नानाजी वाघ यांनी इंगळे नामक सट्टा जुगार व्यावसायीकाच्या पेढीवर रेड करण्याचे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना केवळ बोलावून दमबाजीसह त्यांची विनापरवानगी (?) सट्टापेढी बंद करण्यात आली. स.पो.नि. निलेश वाघ यांचा हेतू खरोखर शुद्ध असता तर त्यांनी म्हटल्यानुसार या पेढीवर खरोखर रेड केली असती. मात्र त्यांचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्यांनी इंगळे यांना बोलावून त्याची आर्थीक चाचपणी केली. मात्र या चाचपणीत इंगळे यांच्याकडून काहीही हशिल न झाल्याने त्याला दम देवून सोडून देण्यात आले. भविष्यात इंगळे यांनी जर पोलिसी भाषेतील सेक्शन (हप्ता) जमा करण्याची तयारी दर्शवली तर त्यांना कदाचीत तोंडी अटी शर्तीवर सट्टा पेढी सुरु करण्याची परवानगी मिळू शकते असे म्हटले जात आहे. केवळ इश्वर साक्षीने त्यांनी परस्पर सट्टा पेढी सुरु केली तर त्यांना पुन्हा शाब्दिक मार दिला जावू शकतो असे देखील जाणकार सांगतात.   

इंगळे यांचा “धन मटका” सुरु होता असे सांगितले जाते. इंगळे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे देखील सांगितले जाते. राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे शासन दरबारी त्याचे विविध अर्जफाटे सुरु असतात असे लोक सांगतात. फैजपूर पोलिस स्टेशनमधील एका जमाकर्त्या (कलेक्टर) पोलिस कर्मचा-याच्या बदलीची याच इंगळे महोदयांनी वरिष्ठ पातळीवर मागणी आणि तक्रार केली होती. सलग काही वर्षापासून हा कर्मचारी एकाच पोलिस स्टेशनला कसा काय ठाण मांडून बसतो असा इंगळे यांचा प्रश्न आहे. इंगळे यांच्या तक्रारीची वरिष्ठ पातळीवर कोणतीही हालचाल नसून तक्रार अर्ज लालफितीच्या थंड बस्त्यात पडून असल्याचे समजते. या जमाकर्त्या पोलिसाची गेल्या सात ते आठ वर्षापासून फैजपूर पोलिस स्टेशनमधून बदली होत नसल्याचे शल्य इंगळे यांना सतावत आहे. त्यामुळे या जमाकर्त्या (कलेक्टर) पोलिस कर्मचा-याची बदली व्हावी यासाठी इंगळेंनी अर्जफाटे केले होते. मात्र “बेअसर होकर मेरी फरियाद वापस आ गयी” अशी गत इंगळे यांच्या अर्जाची झाली.

अवैध व्यावसायिकांकडून धनराशी संकलित करणा-या कर्मचा-यास पोलिसी भाषेत कलेक्टर म्हटले जाते. जिल्हा दंडाधिका-यांपेक्षाही काही ठराविक कलेक्टरांचा मोठा रुबाब असतो असे संबंधीत लोक खासगीत म्हणतात. मात्र “इज्जते, शोहरते, उल्फते, चाहते सब कुछ इस दुनिया मे रहता नही” या वाक्याचा या ठराविक माणूसकीशुन्य   कलेक्टरांना कदाचीत विसर पडतो. पद गेल्यानंतर अशा काही विशीष्ट जमाकर्त्यांना कुणी चहा देखील विचारत नाही. चोरीचा मोबाईल ठेवून घेतल्याचा एक किस्सा वजा ठपका फैजपूर पोलिस स्टेशनमधील कर्मचा-याच्या बाबतीत घडला होता अशी चर्चा आहे. यासह इतर अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकत इंगळेंनी अर्जफाटे करुन शासनाला जागृत करण्याचे काम केले. एवढ्या घडामोडी होत असल्या तरी सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ हे अद्यापही नवीन आहेत का? त्यांना या पोलिस स्टेशनचा कारभार समजून घेण्यासाठी कदाचीत बदलीच्या क्षणापर्यंत वाट बघावी लागेल का? ते कधी जुने होणार? यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरे फैजपूरवासियांना कधी मिळणार? त्यासाठी फैजपूरवासी दोन्ही बंद ओठांना दर्शनी बोट लावून वाट बघत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here