फैजपूर पोलिस उप विभागाची सुत्रे अन्नपुर्णा सिंह यांच्याकडे   

जळगाव : सन 2020 च्या त्रिपुरा बॅचच्या आयपीएस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांची फैजपूर पोलिस उप विभागात सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी पदी नियुक्ती झाली आहे. आयपीएस अन्नपुर्णा सिंह या कडक शिस्तीचा अवलंब करणा-या अधिकारी म्हटल्या जातात. महाराष्ट्र 2019 च्या आयएएस बॅचचे अंकित (जिल्हा परिषद जळगाव सीईओ) यांच्यासोबत अन्नपुर्णा सिंह यांचा विवाह झाला आहे. त्यामुळे भारतीय पोलिस सेवा (कॅडर) नियम 1954 चा नियम 5 च्या उप नियम (2) नुसार त्रिपुरा आणि महाराष्ट्र सरकारच्या सहमतीने अन्नपुर्णा सिंह यांना त्रिपुरा संवर्गातून महाराष्ट्र संवर्गात स्थानांतरीत करण्यात आले आहे.

म.पो.से. अर्थात महाराष्ट्र पोलिस सेवा आणि भा.पो.से. अर्थात भारतीय पोलिस सेवा यांच्या कार्यपद्धतीत जनतेला प्रकर्षाने फरक जाणवतो. पोलिस सेवेचा प्रत्येक टप्पा पार करत डीवायएसपी पदापर्यंत आलेल्या म.पो.से. अधिका-यास पोलिस खात्याच्या कामाव्यतिरिक्त स्थानिक संबंध जोपासण्याची कला अवगत असते. भारतीय पोलिस प्रशासन सेवेतून थेट सहायक पोलिस अधिक्षक तथा डीवायएसपी पदावर नियुक्ती झालेल्या अधिका-यांच्या बाबतीत जनतेचा अनुभव थोडा वेगळा असतो असे म्हटले जाते.

फैजपूर शहर आणि परिसरात सुरु असलेला सट्टा जुगाराचा धुमाकुळ अन्नपुर्णा सिंह थांबवतील असे देखील म्हटले जात आहे. अवघ्या सहा दिवसात चोपडा उप विभागातून फैजपूरला बदली झालेल्या पोलिस अधिकारी अन्नपुर्णा सिंह यांच्यावर फैजपूर परिसरातील सट्टा जुगार रोखण्याचे आव्हान आहे. हे आव्हान त्या कशा पद्धतीने पेलणार ते आगामी काळात दिसू शकते. दि.15 डिसेंबर रोजी अन्नपूर्णा सिंह यांची चोपडा उप विभागासाठी नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार त्या 18 डिसेंबर 2023 रोजी हजर देखील झाल्या होत्या. दरम्यान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले. त्यात अन्नपूर्णा सिंह यांची फैजपूर तर फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांची चोपडा येथे बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here