वर्चस्वाच्या लढाईसाठी सोनू आणि दोध्या झाले सक्रीय – लग्नापुर्वीच अरुणला जीवानिशी केले कायमचे निष्क्रीय

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मसल पॉवरच्या बळावर वर्चस्वाची लढाई लढण्यात, जिंकण्यात आणि मिरवण्यात काही तरुणांना सुख वाटते. अशिक्षित आणि कष्टकरी समुदायाच्या वस्तीत आपले वर्चस्व दाखवणारे असे तरुण हमखास असतात. अंगी तरुणाईचा जोश, मनगटात चमकणारे ब्रेसलेट, गळ्यात चेन, हातात मोबाईल आणि अतिशय निकृष्ट अथवा सुमार दर्जाची भाषा असा काहीसा अवतार या तरुणांचा असतो. प्रत्येक शहरात आणि गावातील काही वस्त्यांमधे असे जोशभरे तरुण आपले वर्चस्व दाखवत असतात. काही नेतेमंडळी अशा तरुणांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करुन घेतात. आपल्याला नेत्यांचा आशिर्वाद असल्याच्या अविर्भावात हे तरुण मोठ्या रुबाबात फिरत असतात. जळगाव शहरातील समता नगर हा परिसर देखील असाच अल्पशिक्षीत तळागाळातील रहिवाशांचा परिसर समजला जातो.

सोनु अढाळे आणि अरुण सोनवणे हे दोघे तरुण समता नगर परिसरातील रहिवासी होते. दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जात होते. अरुण सोनवणे हा सन 2017 मधे एका खूनाच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी होता. जळगाव शहरातील एम.जे.कॉलेज परिसरात झालेल्या खून प्रकरणात अरुणला अटक झाली होती. काही महिन्यांपुर्वीच त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी होती. सोनू अढाळे हा रेतीचा व्यवसाय करत होता. त्याने बाबा गृप नावाचा एक गृप तयार केला होता. या गृपमधे त्याच्या विचाराचे तरुण होते. सोनु अढाळे आणि अरुण सोनवणे या दोघांमधील वाद समता नगर परिसरातील रहिवाशांना चांगल्या प्रकारे माहिती होता.

सोनु अढाळे याच्या गॅंगमधे पप्पु अढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि दोध्या उर्फ पिंट्या शिरसाठ अशा तरुणांचा समावेश होता. सोनु अढाळे याच्या गॅंगमधील दोध्या उर्फ पिंट्या शिरसाठ याच्या चुलत भावाच्या मुलीचे अर्थात पुतणीचे प्रतिस्पर्धी अरुण सोनवणे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे 24 डिसेंबर 2023 रोजी लग्न देखील ठरले होते. आपल्या पुतणीचे प्रतिस्पर्धी अरुण सोनवणे याच्यासोबत ठरलेल्या लग्नाला दोध्या शिरसाठ याचा तिव्र विरोध होता. त्यामुळे अरुण सोनवणे याने आपल्या पुतणीसोबत लग्न करु नये यासाठी दोध्या हा अरुणला धमकी देखील देत होता. तु माझ्या पुतणीसोबत लग्न केले तर मी तुला लग्नापुर्वीच मारुन टाकेन अशी धमकीच दोध्या शिरसाठ याने अरुण सोनवणे याला दिली होती. आपल्या भावी पत्नीच्या काकाने दिलेल्या धमकीला न घाबरता अरुण सोनवणे याने हे लग्न करण्याचे निश्चित केले होते.

दोध्या शिरसाठ याच्या पुतणीसोबत लग्न ठरल्यामुळे अरुण सोनवणे सुखी संसाराची स्वप्न मनाशी रंगवत होता. अरुणची भावी पत्नीदेखील लग्नाच्या तयारीला लागली होती. दोन्ही परिवारामधे लग्नाच्या तयारीला वेग आला होता. मात्र हे लग्न होवू नये यासाठी दोध्या शिरसाठ प्रयत्नशिल होता. आपल्या गॅंगचे वर्चस्व रहावे, अरुणचे वर्चस्व कमी व्हावे असे सोनु अढाळे आणि दोध्या शिरसाठ यांचे विचार होते. त्यातून दोघे समविचारी एकत्र आले होते. समता नगर परिसरात कोणतेही लहानसहान वाद झाले म्हणजे सोनु अढाळे दोन्ही पक्षाच्या लोकांना बोलावून ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होता. अशा प्रकारे तो परिसरातील लोकांवर आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होता. या वर्चस्वाच्या लढाईत सोनु अढाळे स्वत: अथवा आपल्या गॅंगमधील साथीदारांमार्फत कधीकधी वाद घालून दादागिरी करत असल्याचे लोक सांगतात.

10 डिसेंबर 2023 रोजी समता नगर परिसरातील वंजारी टेकडी भागात अरुण सोनवणे याच्या काकाच्या मुलासोबत काही तरुणांचा वाद झाला होता. हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने सोनु अढाळे याने अरुण सोनवणे यास बोलावणे पाठवले. मात्र त्यामागे अरुण सोनवणे याचा काटा काढण्याचा दोध्या शिरसाठ याचा कट होता. आपल्या पुतणीचे अरुण सोबत लग्न होवू नये, त्यापुर्वीच त्याला जीवानिशी ठार करण्याचा दोध्या शिरसाठ याचा बेत होता. तशी दोध्या शिरसाठ याने अरुणला धमकी देखील दिली होती. मात्र निरोप सोनु अढाळे याने पाठवल्यामुळे अरुण गाफील होता. काकाच्या मुलासोबत इतर तरुणांचा झालेला वाद  मिटवण्यासाठी सोनूकडे जाण्यापुर्वी अरुण याने आशिष सोनवणे याला सोबत घेतले. दोघे जण अगोदर अरुणचा भाऊ गोकुळ सोनवणे याच्याकडे आले. आपण सोनू अढाळे याच्याकडे जात असल्याची कल्पना दोघांनी गोकुळ सोनवणे याला दिली.

वंजारी टेकडी भागात गाफील असलेला अरुण सोनवणे येण्याची सोनू अढाळे व त्याच्या गॅंगमधील पप्पू अढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड व दोध्या उर्फ पिंट्या शिरसाठ असे सर्वजण वाटच बघत होते. अरुण सोनवणे आणि आशिष सोनवणे हे दोघे वंजारी टेकडी भागात गेल्यानंतर गोकुळ यास जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गोकुळ गेला असता त्याला भयावह दृश्य दिसून आले.

त्याठिकाणी सोनु अढाळे, पप्पु अढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि दोध्या शिरसाठ असे पाचही जण त्यांच्या हातातील चॉपरने आशिष सोनवणे याच्या शरीरावर सपासप वार करत होते. आशिष सोनवणे याचा आक्रोश ऐकून त्याचे आई वडील व नातेवाईक घटनास्थळी धावत आले. आलेल्या सर्व नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून जखमी आशिषची सुटका केली. नातेवाईकांनी त्याला तातडीने मोटार सायकलवर बसवून वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले. आता अरुण सोनवणे हा एकटा सापडल्याचे बघून पाचही जण त्याच्यावर तुटून पडले.

हातातील चॉपरने सर्वांनी अरुणच्या शरीरावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दोघा तिघांजवळ असलेले चॉपर आलटून पालटून पाचही जणांकडून वापरले जात होते. अरुणवर होत असलेला प्राणघातक हल्ला बघून त्याचा भाऊ गोकुळ हा घटनास्थळी त्याचा बचाव करण्यासाठी सरसावला. सोनु आणि दोध्या अशा दोघांनी आलेल्या गोकुळला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तुला देखील आडवा पाडतो असे म्हणत त्याच्या गळ्यावर चॉपरचे वार करण्यात आले. आपल्या अंगावर होणारा वार चुकवण्यासाठी गोकुळने त्याचा उजवा हात पुढे केला. दोघांच्या हातातील चॉपरचा वार गोकुळच्या उजव्या हाताच्या मनगटासह बोटांच्या मधे लागला. त्यात गोकुळ जखमी झाला. जखमी गोकुळने जोरजोरात आरडाओरड सुरु केली. दरम्यान गोकुळचा भाऊ अरुण सोनवणे हा जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

Atul Vanjari Asstt sub inspector

सोनु आढाळे व अशोक राठोड या दोघांनी त्यांच्या हातातील चॉपरने अरुणच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वार झाल्याने अरुणच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. अरुण मरण पावला आणि आता अजून गर्दी जमा होईल असे गृहीत धरुन सर्व जण शस्त्रांसह घटनास्थळावरुन पळून गेले. जखमी गोकुळची आरडाओरड ऐकून परिसरातील नातेवाईक आणि रहिवासी धावून आले. अरुणच्या गळ्यातून रक्ताची धार वहात होती. त्याच्या पोटात, कंबरेवर, डोक्यात व गालावर चॉपरचे गंभीर वार झाल्याचे दिसत होते.

आलेल्या सर्वांनी अरुण यास उठवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र अरुण काहीही बोलत नव्हता वा हालचाल करत नव्हता. तो मरण पावला होता. काही वेळाने खासगी रुग्णवाहिका बोलावून अरुणला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांसह मयत अरुणसोबत लग्न ठरलेली त्याची भावी पत्नीदेखील दवाखान्यात आली. लग्न ठरलेल्या पतीची हत्या झाल्याचे बघून तिने केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावणारा होता.

या घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळासह रुग्णालयात भेट दिली. या घटनेच्या पार्श्वभुमीवर रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम असल्यामुळे पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली. अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी रुग्णालयात दाखल होत घटनेची माहिती समजून घेतली.

10 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी जखमी गोकुळ सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोनु अढाळे, पप्पु आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड व दोध्या उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 392/23 भा.द.वि. 302, 307, 34  नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील व त्यांच्या सहका-यांनी सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी समता नगर येथे जावून घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी संकलीत करण्यात आलेले पुरावे, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे फरार संशयीत आरोपी कुलदीप उर्फ सोनु पोपट अढाळे (रा. समतानगर, जळगाव) यास 11 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याला पुढील तपासकामी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

पुढीत तपासाच्या घटनाक्रमात दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी या गुन्ह्यातील पिंट्या उर्फ दोध्या शिरसाठ हा त्याचे मुळ गाव नागदुली – म्हसावद येथे आला असल्याची माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. तो पळून जाण्याच्या बेतात असतांनाच पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरसोली मार्गे वावडदा येथे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. तो वावडदा बस स्थानकालगत असलेल्या सरपंच चहा या टपरीच्या आडोशाला आपली ओळख लपवून बसला होता. तो प्रविण उर्फ पिंट्या दोध्या प्रेमराज शिरसाळे (रा. संभाजी नगर, जाकीर हुसेन कॉलनी जळगाव) हाच असल्याची पोलिस पथकाने खात्री केली. अटकेअंती त्याला देखील रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहायक फौजदार  विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

दरम्यान या घटनेतील अशोक महादु राठोड (रा. जाकीर हुसैन कॅालनी, संत गाडगेबाबा चौक, जळगाव) हा नेपानगर येथे लपून बसला असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. पो.नि. जयपाल हिरे यांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक करण्यात यश मिळवले. त्याला केली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत कळस्कर, विजय जाधव आदींनी याकामी कामगिरी बजावली. 

या गुन्ह्यातील फरार संशयीत आरोपी बळीराम चव्हाण यास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रदिप बोरुडे, हे.कॉ. संजय सपकाळे, सुशिल चौधरी, इरफान मलिक, जितेंद्र राजपूत, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, जुलालसिंग परदेशी, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, पो.कॉ. उमेश पवार, विजय जाधव आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. या घटनेतील संशयीत आरोपी पप्पू अढाळे हा फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here