माजी काँग्रेस खासदार डॉ. उल्हास पाटील यांची “डबल ढोलकी”

जळगाव जिल्ह्यातील माजी काँग्रेस खासदार डॉ. उल्हास पाटील यांची डबल ढोलकी प्रवृत्ती त्यांच्याच वक्तव्यातून उघड झाली असून सत्तेसाठी ही राजकीय मंडळी कशी बेडूक उड्या मारते? त्याची जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसचे खासदार बनल्यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांचे कथित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थानचा पसारा वाढवण्याशिवाय विशेष भरीव कामगिरी केली नाही असे बोलले जाते.

हसमुखराय म्हणून ओळखले जाणारे सदा हास्यमुद्रेने वावरणारे डॉ. उल्हास पाटील हे इतर काही राजकारण्यांसारखे त्यांच्या कुटुंबियांचे कोटकल्याण करण्यासह काही खास मतलबासाठी खासदारकीचा केक खेचू इच्छितात असे बोलले जाते. याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर पहिल्या टप्प्यात ते हा पक्ष आणि कॉंग्रेस अशा दोन डगरींवर पाय ठेवत उभे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या पदाधिका-याने त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून घोषणाही केली होती. पण ते नंतर कांग्रेसकडून लढले. खासदार बनले. दरम्यानच्या काळात त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह लावण्याचे प्रकरण गाजले.

काहीच महिन्यांपूर्वी लोकसभा जागा वाटपात रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा सांगितला. जिल्ह्यात दोन जागा आहेत. रावेर हा लेवा पाटीदारांची एकठ्ठा मतपेढी असल्याने तेथे या समाजाचा उमेदवार जिंकतो. गेल्या दोन निवडणूकांमधे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे भाजपातर्फे जिंकल्या होत्या. आता त्यांचे तिकीट कापले जाणार अशी हवा सुटली आहे. दरम्यान नाथाभाऊंनी जिल्ह्यात महाविकास आघाडीची कमान हाती घ्यावी असे शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर नाथाभाऊनीही होकार भरला. त्याचा संदर्भ देत चतुर डॉ. उल्हास पाटील यांनी “आता नाथाभाऊंनी रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणावा” असे जाहीर आवाहन केले. यावेळेपर्यंत बहुधा तेच खासदारकीसाठी बाशिंग बांधून तयार होते.

नाथाभाऊंनी ताकद दिली तर हमखास जिंकू असे त्यांचे गणित. भाजपाला आता जिंकणाराच उमेदवार हवा म्हणून मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीची चर्चा गाजली. तशीच येथूनच नाथाभाऊंची चर्चा झाली. मध्यंतरी नाथाभाऊंची उमेदवारी चर्चेत आली. त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य बिघडल्यानंतर या दोन्ही मातब्बर नेत्यांना महाराष्ट्रातच ठाण मांडून बसायचे आहे असे हळूहळू बाहेर येऊ लागले.

नुकतेच अयोध्येत श्रीराम मंदिर झाले. भाजपची संभाव्य नवी रामलाट बघून डॉ. उल्हास पाटील यांनी त्यांची कन्या केतकी पाटील यांना खासदारकीचा फ्रेश उमेदवार म्हणून राजकारणात प्रोजेक्ट करण्यासाठी स्वतः भाजपात उडी घेण्याच्या हालचाली केल्या. त्याचा सुगावा लागताच काँग्रेस पक्षाने या दोघांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली.

काही महिन्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जळगाव भेट आणि खमक्या भूमिकेसाठी प्रसिद्ध जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांनी डॉ. उल्हास पाटलांना दणका दिला. काँग्रेस पक्षाकडून आधी उमेदवारीसह नाथाभाऊंकडून मदत मागणा-या डॉ. उल्हास पाटील यांची काँग्रेस ते भाजप असा प्रवास होताना “डबल ढोलकी” दोन डगरीवर पाय रोवण्याची चलाखी उघड झाल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here