जळगाव : सावदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे तपास असलेल्या तत्कालीन गुन्ह्यातील नराधम आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स.पो.नि. जालिंदर पळे यापुर्वी नाशिक ग्रामीणच्या घोटी पोलिस स्टेशनला कार्यरत होते. त्यावेळी इगतपुरी तालुक्यातील खंबाळेवाडी येथील एका मुलीवर हिरामण रामचंद्र तिटकारे नावाच्या नराधमाने अत्याचार केला होता. या घटनेप्रकरणी घोटी पोलिस 55/2021 भा.द.वि. 376 (1), 323,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश खरात (पोक्सो न्यायालय) यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पुर्ण झाली. या गुन्हयातील आरोपी हिरामण रामचंद्र तिटकारे (वय 50 वर्ष) रा. खंबाळेवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक याच्याविरुध्द आरोप सिध्द झाला. न्यायालयाने आरोपीस भादवि कलम 376 नुसार दहा वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली आहे.
पिडीत मुलगी रात्री घरात झोपलेली असतांना लाईट बंद करुन आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शरिरसंबंध प्रस्थापित केले. पिडीतेने आरडा-आरोडा केल्यावर आरोपीने पिडीत व साक्षीदार यांना मारहान व शिवीगाळ केली होती. घोटी पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास पुर्ण केला होता. त्यांनी आरोपीविरुध्द भक्कम पुरावे संकलीत करुन सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी अभियोक्ता अनिल पी. बागले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार पी. एस. दराडे यांनी कामकाज पाहीले.