जळगाव : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणा-या नराधमास दहा वर्ष सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किष्णा महादेव गोरे (रा. कुसुंबा ता.जिल्हा जळगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन पिडीत मुलीस फुस पळवुन नेत तिच्यावर सतत बलात्कार व लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी किष्णा महादेव गोरे यास भुसावळ येथील विशेष जिल्हा न्यायधिश व्ही. सी. बर्डे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
आरोपीने त्याचा मित्र अनुप जितेंद्र मांडवे याच्या मदतीने दिनांक 10 जून 2021 रोजी रात्री पिडीतेस तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या समंतीविना पळवून नेत तिच्यावर बलात्कार व लैंगिक अत्याचार करुन तिला गर्भवती केले होते. आरोपीविरुध्द भा.द.वि. कलम 363, 366, 366 (अ), 376(1) 376(2) (एन), सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकार पक्षातर्फे एकुण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पिडीत बालीका, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे, डॉ. खानेता अॅण्डलीब, डिएनए तपासणीस विक्रम ढेरे तसेच तपास अधिकारी एपीआय अमोल पवार यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. स.पो.नि. अमोल पवार यांना त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय तायडे यांचे सहकार्य लाभले.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रविण पी. भोंबे यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी किष्णा महादेव गोरे यांस भा.द.वि. कलम 363 अन्वये 7 वर्ष सक्त मजुरी व रुपये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भा.द.वि. कलम 366 अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भा.द.वि. कलम 366-अ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, भा.द.वि. कलम 376(1), 376(2), (एन) तसेच पोक्सो कायदा कलम 4 अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच पोक्सो कायदा कलम 8 व 12 अन्वये तिन वर्ष कैद व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद देण्याचे आदेश केले आहेत.
आरोपीने सर्व शिक्षा एकत्रित भोगावयच्या आहेत. तसेच अनुप जितेंद्र मांडवे (वय 25 वर्ष) यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. या खटल्यात सरकारपक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता प्रविण पी. भोंबे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पीएसआय भिमदास बी. हिरे व पो. हे. कॉ. आत्माराम भालेराव यांनी मदत केली. सदरच्या खटल्याकडे भुसावळ व जळगांव तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले होते.