आंतरराज्य गुटखा तस्करास इंदोर येथून अटक 

नाशिक : महाराष्ट्रासह विविध राज्यात गुटख्याची तस्करी करणा-या कुविख्यात गुटखा तस्करास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने इंदोर येथून अटक केली आहे. इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी (रा. श्रमिक कॉलनी, राऊ, इंदोर, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.  

दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईच्या दिशेने जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडला होता. या घटनेत सुमारे 21 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशनला  भादवि कलम 328, 272, 273, 188, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात  अमृत भगवान सिंह (रा. वडवेली, पो. हिनौतीया, ता. खिलचीपुर, जि. राजगड, मध्यप्रदेश) आणि पुनमचंद होबा चौहाण (रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली होती.

अटकेतील दोघांकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशी व तपासाअंती गुटख्याची साठवणूक करुन महाराष्ट्र राज्यात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी (रा. इंदोर) याचे नाव निष्पन्न झाले होते. त्याच्या अटकेसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेशातील इंदोर येथे रवाना करण्यात आले होते.

इंदोर शहरातील राऊ परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटखा माफिया इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी यास शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी  इगतपुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलीस करत  आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, पोना योगेश कोळी, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहीरम तसेच इगतपुरी पो.स्टे. च्या पोउनि कांचन भोजने, पोहवा योगश भावनाथ, पोकॉ प्रकाश कासार यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here