जळगाव पोलिस दलात अधिकारी नियुक्तीचे फेरबदल

जळगाव : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिका-यांच्या नव्याने पदस्थापना व जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या झाल्या आहेत. इतर जिल्ह्यांतून जळगाव जिल्ह्यात काही पोलिस अधिकारी नव्याने आले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पाच पोलिस निरीक्षकांसह दोन सहायक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांची पदस्थापना करण्यात आली. यासोबतच दोन पोलिस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी डॉ. विशाल जयस्वाल यांची रावेर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. यावल पोलिस स्टेशनमधून नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आलेले राकेश मानगावकर यांना जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचा कारभार देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी परिचित आणि जुने असलेले अमरावती ग्रामीण येथून आलेले प्रदीप खंडू ठाकूर यांना यावल पोलिस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांना रामानंद नगर पोलिस स्टेशन आणि अशोक पवार यांना पाचोरा पोलिस स्टेशन देण्यात आले  आहे. पांडुरंग पवार यांच्याकडे भडगाव पोलिस स्टेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम यांच्याकडे सायबर पोलिस स्टेशनच्या प्रभारी पदासह आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरिक्षकांमधे अहमदनगर येथून आलेले प्रशांत खंडारे यांची चोपडा शहर आणि महेश येसेकर यांची पारोळा पोलिस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण येथून आलेल्या पोलिस उप निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे असून कंसात नियुक्तीचे ठिकाण. विजय गायकवाड (भुसावळ शहर पोलिस स्टेशन), बबन पाटोळे (फैजपूर पोलिस स्टेशन), चंद्रकांत दवंगे (जामनेर पोलिस स्टेशन), संजय विधाते (पहूर पोलिस स्टेशन), धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंद नगर पोलिस स्टेशन, अहमदनगर येथून आलेले भरत दाते यांना पहूर पोलिस स्टेशन, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया वसावे यांना रावेर पोलिस स्टेशनला पदस्थापना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here