जळगाव : गेल्या चार दिवसांपुर्वी शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आग लागल्याची एक घटना घडली होती. या आगीत माधव नगर भागातील रहिवासी अमोल जंगले यांची मोटार सायकल आणि त्यांची तेरा वर्षाची मुलगी अक्षरा हिची सायकल जळून खाक झाली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद घेण्यात आली होती. या आगीत अक्षरा जंगले या मुलीची सायकल जळून गेल्याने घरुन शाळेत जाण्यासाठी तिला सहा कि.मी. अंतर पायी कापावे लागत होते. शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी तिची होणारी कसरत शनीपेठ पोलिस बांधवांच्या लक्षात आली.
दरम्यान सामाजीक बांधिलकी जपत शनीपेठ पोलिस स्टेशनला कार्यरत हे.कॉ. रविंद्र परदेशी आणि विजय पाटील यांनी तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. या दोघा पोलिस बांधवांनी उद्योजक मित्रांच्या मदतीने तिला एक नवी कोरी-करकरीत सायकल विकत घेऊन दिली. नवी सायकल मिळाल्यामुळे अक्षरा जंगले हिच्या चेह-यावरील आनंद पोलिस बांधव मित्रांसह त्यांच्या उद्योजक मित्रांना एक आगळेवेगळे समाधान देऊन गेला. हे.कॉ. रविंद्र परदेशी, हे.कॉ. विजय पाटील आणि त्यांचे उद्योजक मित्र संदीप इंधाटे, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर गावंडे, भुषण पाटील, अविनाश पाटील, बंटी राणे आणि गिरीष पाटील या उद्योजक मित्रांचे आर्थिक सहकार्य याकामी लाभले.