एक हजाराच्या लाचेचा वायरमनला हाय व्होल्टेज झटका 

जळगाव : एक हजाराच्या लाचेच्या मोहात पडलेल्या वायरमनला एसीबी कारवाईचा झटका लागला असून त्याच्या विरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीन शहा करामत शहा असे विज वितरण विभाग वरणगांव येथे कार्यरत असलेल्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. 

या घटनेतील तक्रारदारास त्याच्या घराला नविन वीज मीटर बसवायचे होते. त्यासाठी तक्रारदाराने अगोदरच वरणगाव येथील विज वितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज करुन डिमांड नोट भरली होती. त्यानंतर डिमांड नोटची झेरॉक्स प्रत सही शिक्का मारून त्याची स्थळ प्रत देखील घेतली होती. याबाबत वायरमन अमीन शहा यांना तक्रारदाराने विचारपूस केली असता दोन हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. 

तक्रारदाराच्या एसीबी कडील तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता वायरमन अमिन शहा याने तडजोडीअंती एक हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. दरम्यान एसीबी सापळ्याचा संशय येताच तक्रारदाराच्या गळ्यातील व्हॉइस रेकॉर्डर त्याने जबरदस्तीने हिसकावून घेत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. वायरमन शहा यास एसीबी पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तसेच सापळा पथकातील सहायक फौजदार     दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे यांच्यासह पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ अमोल सूर्यवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here