दहा हजाराच्या लाचेत विद्याची गेली मती — एसीबीच्या जाळ्यात मोहाची झाली माती

जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रातील अधिका-यांसोबत आपली चांगली ओळख असून तुम्हाला म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देते असे म्हणून तिस  हजाराच्या ठरलेल्या लाचेपैकी दहा  हजाराचा पहिला हप्ता घेणा-या  खासगी महिलेस एसीबी पथकाने अटक  केली आहे. विद्या परेश शहा असे या लाचखोर खासगी महिलेचे नाव  आहे. तथापी या खासगी महिलेची लाच मागण्याची हिंमत नेमक्या कोणत्या अधिका-याच्या बळावर अथवा आशिर्वादाने झाली हे  अद्याप उघड  झालेले नाही.

या घटनेतील तक्रारदाराची जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील मौजे पुरी या गावी वडीलोपार्जीत शेती आहे. तक्रारदारास या शेतजमीनीवर दुग्ध व्यवसाय करायचा होता. या व्यवसायासाठी म्हशी खरेदी करण्यासाठी त्याने काही दिवसांपुर्वी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी विद्या परेश शहा या खासगी महिलेसोबत त्याची ओळख झाली. मी तुमचे प्रकरण मंजूर करुन आणून देते. माझी येथील अधिका-यांशी ओळख आहे असे सांगून तिने तक्रारदारास तिस  हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या लाचेच्या पहिल्या हप्त्याची दहा हजार रुपयांची रक्कम स्विकारतांना दबा  धरुन बसलेल्या धुळे एसीबी पथकाने झडप घालून पुढील कारवाई केली.  

लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here