बस मधून मद्य तस्करी – चालक, वाहकास अटक 

नाशिक : गुजरात राज्याच्या बसमधून मद्याची तस्करी करणा-या चालक – वाहकास विना परवाना विदेशी मद्यसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात चक्क बस चालक आणि वाहक मद्य तस्करी करत असल्याचे या घटनेतून उघडकीस आले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याकामी नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशाने कारवाईचा धडाका सुरु आहे. त्याअनुषंगाने नाशिक जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरुन अवैधरित्या होणारी मद्याची वाहतुक व विक्री रोखण्यासाठी जिल्हयाच्या सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावली जात आहे.

18 मार्च रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळाची नाशिक सुरत (बस क्र. GJ-18-Z-8970) या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक – सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचला.  गुजरात राज्यात जाणारी बस थांबवून तिची तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 14  हजार 635 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनला गु.र.नं. 138/24 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील विजय विनोद बलसार (रा. सुरत बस चालक) आणि अमृतभाई भुवनभाई पटेल (रा. सुरत बस कंडक्टर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात किस्मत ब्रॅंडी शॉप, पंचवटी, नाशिक या दुकानाचे मालक तसेच अवैध मद्यसाठयाच्या वाहतुकीस मदत करणा-या इसमांना वॉंटेड आरोपी दर्शवण्यात आले आहे. अशा बेकायदा पध्दतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक/मालक मद्याची विक्री, तस्करी करत असल्यास त्याची माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या मदतीने पुढील कार्यवाही केली जात आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा प्रविण सानप, किशोर खराटे, पोकॉ जाधव, बोडके, मोरे आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here