अर्धवट जळालेल्या तरुणाच्या खूनाचा उलगडा

नाशिक (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : खून करुन अर्धवट जळालेल्या अज्ञात तरुणाच्या खूनाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने लावला आहे. शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख (रा. रूम नं. 23, खालीदशेठ चाळ, भिवंडी, जि. ठाणे आणि सादिक इब्राहिम खान (रा. वारसी टॉवर, 402, सावरकर नगर, मुंब्रा, जि. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत.  

अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत 8 मार्च 2024 रोजी रात्रीचे वेळी अभोणा ते कनाशी रस्त्यावरील गोळाखाल शिवारात पुलाखाली असलेल्या नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिस पथकाला मिळाला होता. या घटनेतील अज्ञात मारेक-यांनी अज्ञात मयतास अज्ञात कारणावरून जीवे ठार केले होते. मयताची ओळख पटू नये यासाठी मारेक-यांनी पुरावा तरुणाचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी 9 मार्च 2024 रोजी अभोणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाग 5 गु.र.न. 33/24 भा.द.वि. 302, 201 नुसार दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे व त्यांचे सहकारी करत  होते.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, अभोणा पो.स्टे.चे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. घटनास्थळावर फॉरेन्सीक पथकासह श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. मयताच्या अंगावरील चीजवस्तू व चेह-यावरुन त्याची ओळख पटवण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस स्टेशनसह नजीकच्या जिल्हयांमध्ये मयताचे वर्णनासह तपास याद्या प्रसारीत करण्यात आल्या होत्या. परंतु मृतदेहाची ओळख पटवण्याकामी अपयश येत होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासुन सलग सात दिवस कनाशी व अभोणा परिसरात तळ ठोकून गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. घटना घडली त्यादिवशी महाशिवरात्रीचा सण व कळवण तालुक्यातील सिध्देश्वर मंदिर परिसरात जत्रा होती. त्यामुळे अभोणा ते कनाशी रस्त्यावर वर्दळ होती. घटनास्थळाच्या आजुबाजूचा परिसर तसेच नजीकच्या पाडयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली असता घटनेच्या दिवशी एक काळ्या रंगाचे चारचाकी वाहन कनाशी रोड परिसरात आले असल्याची पुसटशी माहिती तपास पथकास समजली. त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित केली. सातत्याने अथक परिश्रम करत घटनास्थळ परीसरात मिळुन आलेल्या भौतिक व तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करण्यात आले. मिळालेल्या माहीतीच्या आधारे ठाणे जिल्हयातील भिवंडी येथील काळया रंगाच्या इनोव्हा कार चालक व मालकाची गोपनीय माहिती संकलीत करण्यात आली. त्यानुसार भिवंडी व मुंब्रा येथून अनुक्रमे शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख आणि सादिक इब्राहिम खान या दोघा संशयीतांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

ताब्यातील दोघांची कसून चौकशी केली असता दि. 8 मार्च 2024 रोजी त्यांच्यासोबत आणखी तिघे इसम भिवंडी येथून मालेगाव शहरात आले होते. अधिक चौकशी व तपासात संशयीत शहानवाज उर्फ बबलु व साजीदखान या दोघांसोबत शहारुफ खान  मेहबूब खान हा तिसरा इसम देखील निष्पन्न झाला. शहारुफ खान मेहबुब खान (रा. सेक्टर नं. 15, वाशी, नवी मुंबई, मुळ रा. आझमगड, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आणि पत्ता त्याच्या फोटोसह नातेवाईकांच्या चौकशीत खात्रीलायकरित्या निष्पन्न झाले.

गुन्ह्यात संशयीतांनी वापरलेली इनोव्हा कार (MH-01-AE- 0008) आणि त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या पुढील तपासकामी दोघांना अभोणा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकंदरीत तपासाअंती संशयीत आरोपी शहानवाज उर्फ बबलु शोएब शेख व सादिक इब्राहिम खान हे फोर व्हिलर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी ते मालेगाव शहरात फोर व्हिलर कार बघण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या मालेगाव येथील अन्य साथीदारांसह संगनमत करुन मयत शहारुफ खान मेहबुब खान याच्या वर्तनाला कंटाळून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. शहारुफ खान बेशुध्द झाल्यानंतर तो मयत झाल्याचे समजून त्याला मालेगाव पासून इनोव्हा कारने अभोणा पोलीस स्टेशन हद्दीतील निर्जनस्थळी आणले गेले. या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (कळवण विभाग) किरण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे सहकारी पोउनि संदिप पाटील, पोहवा नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, हेमंत गिलबिले, योगेश कोळी, प्रदिप बहिरम, शरद मोगल, चापोहवा भवर, विकी म्हसदे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here