चाकू व कोयत्याचा धाक दाखवत एटीएम फोडणारे अटकेत

नाशिक (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): सिक्युरिटी गार्डला चाकू व कोयत्याचा धाक  दाखवत चारचाकी कार चोरुन एटीएम फोडणा-या चौघांपैकी दोघा गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेसह एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. गोरक्ष लक्ष्मण सोनवणे (रा. मुसळगाव ता. सिन्नर – नाशिक) आणि सुदर्शन शिवाजी ढोकणे (रा. कुसमाडी ता. येवला ह.मु. मुसळगाव ता. सिन्नर जि. नाशिक) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशन हद्दीतील औषधी तयार करणा-या कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला 13 मार्च 2024 रोजी चौघा अज्ञात आरोपींनी दमदाटी करुन चाकू व कोयत्याचा धाक दाखवला होता. चाकू व कोयत्याचा धाक  दाखवत चौघांनी कंपनीच्या ऑफीसमधील सीसीटीव्ही कॅमे-याचे डीव्हीआर, मॉनीटर, वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट आदी वस्तू ताब्यात घेत सिक्युरिटी गार्डला बांधून ठेवत कार जबरीने चोरुन नेली होती.

Raju Surve Police Inspector Nashik Rural Local Crime Branch

त्याच दिवशी पहाटेच्या सुमारास परिसरातील सारस्वत बॅंकेच्या एटीएममधे या चौघा आरोपींनी प्रवेश करत सिक्युरिटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवत एटीएम मशीनला पट्ट्याने दोरासारखे बांधून चोरीच्या कारने बाहेर ओढले होते. यावेळी सिक्युरिटी गार्डला रुममधे कोंडून जबरी चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी एटीएममधे चौदा लाख  रुपयांची रोकड होती. या दोन्ही  घटनेप्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनला जबरी लुटीचे दोन  वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले  होते. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चोरीची कार  घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत आढळून आली होती.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे आणि एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे पो.नि. यशवंत बाविस्कर यांना तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने संयुक्त तपासादरम्यान आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हयातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती संकलीत केली.

या घटनेतील सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने दोन्ही गुन्हे केल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि  एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोरक्ष सोनवणे आणि सुदर्शन ढोकणे या दोघांना ताब्यात घेत अटक केली. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. पुढील तपासकामी दोघांना गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार व मुद्देमालासह एमआयडीसी सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील मुख्य फरार आरोपी प्रविण उर्फ भैय्या कांदळकर याचा पोलिस पथक शोध घेत आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, पोउनि. किशोर पाटील, एलसीबीचे पोलीस अंमलदार विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गरुड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले तसेच एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाणे आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here