जळगाव, दि.२९ (क्रीडा प्रतिनिधी) – भारतातील अग्रगण्य मानली जाणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरकार्यालयीन ‘अ’ गट स्पर्धेचा अंतिम सामना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. विरूद्ध मुंबई कस्टम्स यांच्या दरम्यान दि. २७, २८, २९ मार्च २०२४ रोजी मुंबई स्थित बांद्र-कुर्ला संकुलाच्या मैदानावर खेळला गेला.
मुंबई कस्टम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला, आपल्या कर्णधाराचा निर्णय सुयोग्य ठरवताना मुंबई कस्टम संघाने अप्रतिम गोलंदाजी करीत जैन इरिगेशन संघाला १४५ धावांत रोखले. यात जयस्वाल याने ४० धावात ५ बळी, तर चव्हाण याने ३२ धावात ४ बळी मिळवीले. जैन संघाचा आघाडीचा फलंदाज शाश्वत जगताप याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याला राॅयस्टन डायस याने २१ धावांचे योगदान दिले.
१४५ धावांचा पाठलाग करणारा मुंबई कस्टम संघ फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नाही. जैन संघातील जळगावचा खेळाडू शशांक अत्तरदे याने अत्यंत भेदक अशी ऑफस्पीन गोलंदाजी करताना मुंबई कस्टम संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडीत केवळ ३७ धावांत ७ बळी मिळविल्या. तर जळगावच्याच जगदिश झोपे याने सुद्धा २ महत्त्वपुर्ण बळी मिळवीत शशांक याला उत्तम साथ दिली व मुंबई कस्टम संघाला १२५ धावांवर गुंडाळून २० धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली.
आपल्या दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत जैन संघाचा कर्णधार जय बिस्टा याने नाबाद २०१ धावा केल्या. तर सुवेद पारकर याने ११२ धावांचे योगदान दिले. व जैन इरिगेशन संघाने एकुण ३ बाद ३७९ धावांवर आपला डाव घोषित केला. मुंबई कस्टम्स संघाने आपला पराभव मान्य करीत हा अंतिम सामना जैन इरिगेशन संघाला बहाल केला.
जैन इरिगेशन संघ खालीलप्रमाणे – १) जय बिस्टा २) शाश्वत जगताप ३) मनन भट ४) सुवेद पारकर ५) आयुष झिमरे ६) साईराज पाटील ७) राॅयस्टन डायस ८) विजय गोयील (सर्व मुंबई) ९) सुरज शिंदे (पुणे) १०) शशांक अत्तरदे ११) जगदिश झोपे (जळगाव) प्रशिक्षक – १) समद फल्ला (पुणे), २) अनंत तांबवेकर (सांगली) मार्गदर्शक – मयंक पारिख (मुंबई)
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीने खेळाडूंना सदैव पाठबळ देण्याचे धोरण राबविले आहे. क्रीडापटुंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कंपनीद्वारे अनेक वर्षांपासून आपला क्रिकेट संघ मुंबईतच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘टाईमशील्ड’ या आंतर कार्यालयिन क्रिकेट स्पर्धेत २०१० पासून सातत्याने सहभागी होत आहे. मागील काही वर्षांपासून या संघाचा समावेश ‘अ’ गटात झालेला आहे. आजपावेतो या संघाने सन २०१४ व आता २०२४ मध्ये ‘अ’ गटाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवित दुसऱ्यांदा टाईमशील्ड चषक आपल्या नावे केला आहे. संघातील सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करताना विशेष अभिमान व आनंद वाटत आहे. आमची कंपनी सर्वच प्रकारच्या खेळांना व खेळाडूंना आपला सक्रिय पाठिंबा देत आली आहे व भविष्यात देखील खेळाडूंच्या उन्नतीसाठी कटिबद्ध राहू याची ग्वाही पण या विशेष प्रसंगी देतो. – अतुल जैन सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि