खूनाच्या घटनेतील दोघा फरार संशयितांना अटक

जळगाव :  उघडकीस आलेल्या खूनाच्या घटनेतील दोघा फरार संशयितांना सावदा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सुकलाल रतन लोहारे (रा.नेपानगर – म.प्र) आणि अर्जुन मुन्ना आवासे (रा. ब-हाणपुर – म.प्र) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. सावदा शहरातील कोचुर रस्त्यावर रविंद्र बेंडाळे याचे शेत आहे. या शेतात शेत मजुरांसाठी बांधलेल्या घरात सुभाराम बारेला या मजुराचा सकाळी साडे सात वाजता खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

मयत सुभाराम बारेला (रा. आंबळी ता. झिरण्या जि. खरगोन मध्यप्रदेश) हा आज सकाळी कामावर आला नाही म्हणून शेत मालक बेंडाळे हे त्याचा शोध घेण्यासाठी शेतात आले असता खूनाचा प्रकार उघडकीस आला. शेतातील घरात सुभाराम याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खुन झाल्याचे आढळुन आले. या घटनेप्रकरणी लोकेश बेंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र.न. 63/24 भा.द.वि. 302 नुसार अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सपोनि जालिंदर पळे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आजुबाजुच्या परीसरातील सालगडी व मजुरांची माहिती संकलित केली.

शेतातील दोन सालगडी ते राहत असलेल्या ठिकाणी आढळून आले नाही. ते फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्यावर स्थिरावली. फरार दोघा मजुरांनी त्यांची मजुरी सकाळीच शेत मालकाकडून घेतली होती अशी माहिती समोर आली. त्यांचा शोध घेण्यासाठी चार तपास पथके तयार करून ती रवाना करण्यात आली.

एका फरार संशयीताचे नातेवाईक नजीकच्या उधळी गाव परिसरात रहात असल्याचे माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले. नंतर क्रमाने दुसऱ्या संशयीताला देखील ताब्यात घेण्यात आले. दोघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात वाद झाल्याची माहिती पुढे आली. या वादातून दोघांनी मयत झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, सहाय्यक फौजदार संजय देवरे, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोहेकॉ देवेंद्र पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोकॉ प्रकाश जोशी, पोकॉ किरण पाटील आदींनी या तपासात सहभाग घेतला. घटनास्थळावर कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना केवळ चौकशीवरून अवघ्या चार तासांच्या कालावधीत दोघे संशयित आरोपी निष्पन्न करण्यात आले. या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पो. अंमलदार, अंगुली मुद्रातज्ञ, फॉरेन्सिक पथक, श्वान पथक यांची देखील मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here