जळगाव : प्रियकर व प्रेयसी अशा दोघांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेप तर वकिलासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राकेश संजय राजपूत (रा. रामपुरा, चोपडा) व वर्षा समाधान कोळी (रा. सुंदरगढी, चोपडा) या प्रेमी युगलाच्या हत्येप्रकरणी अमळनेर येथील न्या. पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी चोपडा येथे ही खूनाची घटना घडली होती.
तुषार आनंदा कोळी, भरत संजय रायसिंग, बंटी उर्फ शांताराम अभिमन कोळी, आनंदा आत्माराम कोळी आणि रवींद्र आनंदा कोळी अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी राकेश हा त्याची प्रेयसी वर्षा हिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी परिसरातील काही जणांनी त्यांना मोटारसायकलने वराड रस्त्यावर नेले. तिथे एका अल्पवयीन मुलाने गावठी पिस्तूलने राकेशच्या डोक्यात गोळी झाडली. राकेश तडफडत असताना या मुलाने प्रतिकार करणाऱ्या वर्षाचाही गळा दाबला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर हा मुलगा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला होता. अँड. नितीन पाटील याने पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिला. रवींद्र कोळी याने जिवंत काडतुसे लपवली तर पवन माळी याने कपडे जाळून पुरावे नष्ट केले होते होते. ही बाब पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आली. अँड. नितीन मंगल पाटील आणि अँड. पवन नवल माळी यांना संगनमत करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारी वकील अँड. किशोर बागुल यांनी 21 साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. गढरी, मनोज पाटील, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपी यांचा आपसातील वकिलाशी संवाद याबाबतचे सीडीआर रिपोर्ट ग्राह्य धरत न्या. चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे.