अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करुन पसार झालेल्या दोघांना अटक

नाशिक : वावी पोलीस स्टेशन हद्दीतील कहांडळवाडी ता. सिन्नर येथे खून करुन पसार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील कसारा येथून अटक केली आहे. कृष्णा उर्फ पोपट जालींदर जाधव (रा. चिंचोली गुरव ता संगमनेर) आणि अजय सुभाष शिरसाठ (रा. चास ता सिन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

3 एप्रिल 2024 रोजी सकाळी नऊ वाजता वावी पोलीस स्टेशन हद्दीत कहांडळवाडी शिवार, ता सिन्नर येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृददेहाच्या बाजुला रक्ताने माखलेला दगड देखील पडलेला होता. मयत हा दिलीप भाउसाहेब सोनवणे (रा. चिंचोली गुरव ता संगमनेर जि. अहमदनगर) हा असल्याचे चौकशी व तपासाअंती निष्पन्न झाले होते. अज्ञात मारेकऱ्यांनी मयताच्या डोक्यावर, मानेवर वार करून त्यास ठार मारलेले होते. 

या घटनेप्रकरणी वावी पोलीस स्टेशनला गु.र.न. 148/24 भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत दिलीप सोनवणे याच्यासोबत राहणारा त्याचा मावसभाऊ कृष्णा उर्फ पोपट जालींदर जाधव आणि मित्र अजय सुभाष शिरसाठ यांनी दिलीप सोनवणे याचा खून केल्याची माहीती तपासात पुढे आली. गुन्हा घडल्यापासुन कृष्णा जाधव व अजय शिरसाठ हे दोघे फरार होते. त्यांचे मोबाईल देखील बंद येत होते. वावी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांकडुन त्यांचा शोध सुरु होता.

कृष्णा जाधव आणि अजय शिरसाठ हे दोघे कसारा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजु सुर्वे यांना गुप्त बातमीदारामार्फत समजली. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

नाशिक ग्रामिण जिल्ह्य पोलीस अधीक्षक विकम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोलीस अंमलदार बवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, विश्वनाथ काकड, प्रदीप बहीरम, चालक विकी म्हसदे व ईगतपुरी पोस्टेचे सहायक फौजदार गणेश परदेशी, पोकॉ अभिजीत पोटींदे यांच्या पथकाने या गुन्ह्यात सहभाग घेत गुन्हा उघडकीस आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here