पिस्टलच्या धाकावर बारा लाखांच्या जबरी चोरीचा गुन्हा उघड

जळगाव : पिस्टलच्या धाकावर बारा लाख  रुपयांच्या जबरी चोरीचा गुन्हा भुसावळ तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. सागर बबन हुसळे (रा. फेकरी ता. भुसावळ) आणि अतुल दिपक खेडकर (रा. लहुजी नगर जामनेर) या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोघा अल्पवयीन मुलांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जबरी चोरीतील दहा लाख  रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन असा पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भिमराव लक्ष्मण तायडे हे जामनेर येथील तेलाच्या व्यापा-याकडे कॅशीयर म्हणून नोकरीला आहेत. दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी तेल विक्रीची 11 लाख 7 हजार 742 एवढी रोख रक्कम ते मदतनिसासह मोटार सायकलने जामनेर येथे घेवून जात होते. सुनसगांव, कु-हा पानाचे मार्गे जामनेर येथे जात असतांना सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्याच्या दरम्यान पाठीमागून तीन अज्ञात मोटार सायकलस्वार आले. तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघांनी पिस्टलचा धाक  दाखवत त्यांच्या ताब्यातील रोख  रक्कम असलेली कापडी पिशवी हिसकावून नेली. जामनेरच्या दिशेने तिघे जण मोटार सायकलने पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन आदींची वेगवेगळी पथके या गुन्ह्याच्या तपासकामी तयार करण्यात आली  होती. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. विशाल पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सागर बबन हुसळे आणि अतुल दिपक खेडकर या दोघांना तसेच दोघा अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला. सागर आणि अतुल या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. नजनपाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सपोनि विशाल पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन डी.बी. पथकातील हे.कॉ. उमाकांत पाटील, रमण सुरळकर, पोलिस नाईक योगेश माळी, पो.कॉ. प्रशांत सोनार, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पथकातील पोहेकॉ. युनुस मुसा शेख, दिपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, पोना कैलास बाविस्कर, पोना नितीन चौधरी, पो.कॉ. राहुल महाजन, उमेश बारी, स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि अमोल मोरे, स.फौ. संजय हिवरकर, स.फौ. विजयसिंग पाटील, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, कमलाकर बागुल, संदिप पाटील, किशोर राठोड, प्रवीण मांडोळे, पोना रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोकॉ. प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने या कारवाई व तपसकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here