थप्पड की गुंज बरसली सुकलालच्या कानात — सुभारामला मरण आले जड दगडाच्या घावात

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): सुकलाल रतन बारेला हा तरुण मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात रोजगार मिळवण्यासाठी आला होता. रावेर तालुक्यातील मस्कावद या गावी तो मिळेल ते काम करुन आपला उदरनिर्वाह करत होता. मध्यप्रदेशातील त्याच्या मुळ गावापासून काही अंतरावर असलेल्या गावी अर्जुन बारेला हा तरुण रहात होता. अर्जुन हा देखील मस्कावद येथे रोजगारासाठी आला होता. दोघे मध्यप्रदेशातील तरुण एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत होते. दोघांचे मुळ गाव देखील जवळ जवळ होते.

सुकलाल यास दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे सुकलाल हा दररोज सावदा या गावी एका दारुच्या अड्ड्यावर अर्थात मधुशाळेत मद्यप्राशन करण्यास जात होता. तळीरामांच्या मधुशाळेत दारु अर्थात मद्यप्राशन करणारे सर्वजण समान असतात. याठिकाणी जातपात, समाज, धर्म असा कोणताही भेदभाव नसतो. एका विशिष्ट धेय्याने प्रेरीत होऊन सर्वजण अर्थात दारुकुट्टे या ठिकाणी एकत्र जमतात. ज्या दारुच्या अड्ड्यावर सुकलाल हा नियमीत ग्राहक म्हणून येत होता त्याच अड्ड्यावर सुभाराम बारेला हा तरुण देखील नियमीतपणे दारु पिण्यासाठी येत होता. येतांना दोघेजण अगदी शिस्तीत पथसंचलन करत येत होते. मात्र मद्यप्राशन केल्यानंतर परत जातांना त्यांची शिस्त बिघडत असे.

दारुच्या अड्ड्यावर सुकलाल आणी सुभाराम या दोघांची मैत्री झाली. दारुचा अड्डा दोघांची मैत्री होण्यास एक माध्यम ठरला. या मधुशाळेच्या माध्यमातून दोघांची मैत्री जमली. दोघे एकमेकांचे मित्र बनले. मिळेल तेथे काम करणारे सुकलाल आणि सुभाराम हे दोघे तरुण सावदा येथील दादा बेंडाळे यांच्या शेतात काम करु लागले. शेतमालक दादा बेंडाळे यांच्या शेतात मजुरांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या होत्या. योगायोगाने सुकलाल आणि सुभाराम या दोघा तरुणांना बेंडाळे यांच्या शेतातील खोल्यांमधे शेजारी शेजारी राहण्याचा योग आला. दोघे एकमेकांचे शेजारी बनले. दोघे तरुण आपआपल्या पत्नीसह शेजारी शेजारी रहात होते.

काही दिवसांनी सुकलालचे शेजारी राहणा-या सुभारामच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याच्या पत्नीला संशय येऊ लागला. त्यातून सुकलाल आणि त्याची पत्नी या दोघांमधे वादाची ठिणगी पडू लागली. दोघा पती पत्नीत वाद होऊ लागले. त्यातून सुकलालची पत्नी त्याला सोडून मुलाबाळांसह तिच्या माहेरी निघून गेली. त्यामुळे सुकलाल आता एकटाच रहात होता. शेजारी राहणा-या सुभारामला देखील सुकलालवर संशय येऊ लागला. सुकलालचे आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा सुभारामला देखील संशय येऊ लागला. त्यातून सुभाराम आणि त्याची पत्नी यांच्यात देखील वाद होऊ लागला. वेळप्रसंगी सुभाराम त्याच्या पत्नीला मारझोड देखील करु लागला. आपल्यामुळे सुभाराम आणि  त्याच्या पत्नीत वाद होत असल्याचे बघून सुकलालने दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेत तो निर्णय अमलात आणला. सुकलाल हा मस्कावद येथील जितेंद्र चौधरी यांच्या वाड्यात राहू लागला. पत्नी सोडून गेल्यामुळे सुकलाल मस्कावद येथे एकटाच रहात होता. मिळेल ते काम करुन तो आपला उदरनिर्वाह करत होता. अधुनमधून सुकलाल हा सावदा येथे सुभारामच्या घरी दारु पिण्यासाठी येत जात होता. दोघे सोबत बसून मद्यप्राशन करत होते.

दिनांक 29 मार्च 2024 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सुकलाल बारेला आणि त्याचा मध्यप्रदेशातील मुळ रहिवासी मित्र अर्जुन बारेला असे दोघे जण पायी पायी मस्कावद येथून सावदा येथे दारु पिण्यासाठी सोबत आले. खन्ना नावाच्या दारु विक्रेत्याकडे दोघांनी सोबत मद्यप्राशन केले.  त्यानंतर दोघांनी मद्याचे एकुण तिन जणांसाठी लागणारे पार्सल प्लॅस्टीकच्या पिशवीत घेतले. त्या मद्य पार्सलसह सुकलाल आणि त्याचा मित्र अर्जुन असे दोघेजण सुभारामच्या घरी दादा बेंडाळे यांच्या शेतात जाण्यास निघाले. रात्री दहा वाजेच्या सुमारास सुकलाल, सुभाराम आणि अर्जुन असे तिघेजण अंगणात मद्यप्राशन करण्यास बसले. मद्यप्राशन करत असतांना तिघांना चांगल्याप्रकारे झिंग आली. मद्याच्या नशेत सुकलालने सुभारामसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

तु आम्हाला तुझ्याकडे दारु पिण्यासाठी बोलावतो आणि आम्ही आमच्या पैशाने दारु आणतो. तु आम्हाला दारु का पाजत नाही? असे म्हणत सुकलालने सुभारामसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आज तु आम्हाला दारु पाज असा हट्ट सुकलालने सुभारामकडे केला. सुकलालच्या बोलण्याचा सुभारामला राग आला. रागाच्या भरात सुभारामने सुकलालच्या दोन थोबाडीत लगावल्या. सुभारामने आपल्या थोबाडीत लगावल्याचा सुकलाल यास राग आला. दोन थोबाडीत बसल्यामुळे सुकलालची दारुची नशा खाडकन उतरली. त्यानंतर संतापाच्या भरात सुभाराम तेथून निघून गेला. त्यानंतर सुकलाल आणि त्याचा मित्र अर्जुन हे दोघे देखील तेथून निघून आले. काही अंतरावर शेताच्या गाड  रस्त्यावरील लिंबाच्या झाडाखाली सुकलाल आणि अर्जुन हे दोघे जण  झोपी गेले.

रात्री दोन वाजेच्या सुमारास सुकलाल यास जाग  आली. त्याच्या मनात सुभारामविषयी राग  उफाळून आला. “थप्पड की गुंज” सुकलाल यास स्वस्थ बसू देत नव्हती आणि झोपूही देत नव्हती. राहून राहून सुकलालच्या कानात सुभारामने मारलेली “थप्पड की  गुंज” ऐकू येत होती. अखेर सुभाराम यास या जगातूनच कायमचे संपवण्याचा निश्चय सुकलाल याने मनाशी केला. एवढ्या रात्री जागा झालेल्या सुकलालने सोबत असलेल्या अर्जुनला झोपेतून उठवले. आज सुभारामचा गेम करुन टाकू, माझ्या डोक्यातून त्याचा विचार जातच नाही असे सुकलालने अर्जुनला बोलून दाखवले. सुभारामला मारल्याशिवाय मला शांतता लाभणार नाही असे देखील सुकलालने अर्जुनला म्हटले. काहीवेळाने सुकलाल आणि त्याचा साथीदार अर्जुन असे दोघे जण सुभारामच्या खोलीजवळ आले.

दोघांनी खिडकीतून पाहीले असता सुभाराम हा गाढ झोपलेला होता. सुकलाल याने बांबूच्या मदतीने शिताफीने ग्रीलची खिडकी उघडून हळूच आत प्रवेश केला. त्यानंतर खोलीचा दरवाजा आतून उघडून बाहेर आला. बाहेर उभ्या असलेल्या अर्जुनने सुकलाल यास म्हटले की मी सुभारामला हात लावणार नाही, मला  फसायचे नाही. तुला काय करायचे ते तू कर असे म्हणत अर्जुनने सावध पवित्रा घेतला. सुभारमला ठार करण्यास अर्जुनचा नकार ऐकल्यानंतर सुकलालने नजीकच्या ट्युबवेलजवळ कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा भलामोठा दगड खांद्यावर उचलून आणला. रुममधे लाकडी पलंगावर गाढ झोपेत असलेल्या सुभाराम बारेला याच्या डोक्यात तो दगड सुकलालने तीन ते चार वेळा हाणला. भलामोठा अवजड दगड डोक्यातबसल्यामुळे निद्रेच्या अधीन असलेल्या सुभारामच्या डोक्यातून रक्त निघू लागले. ते रक्त सुकलालच्या तोंडावर आणि कपड्यावर उडाले. त्यानंतर सुकलाल बारेला याने तो दगड सुभाराम यास छातीवर मारला. त्यानंतर सुभाराम पलंगाच्या खाली पडला. एवढे कमी झाले म्हणून की काय  सुकलालने तो दगड पुन्हा उचलून सुभारामच्या छातीवर मारला. दगडाच्या वारंवार झालेल्या घावात सुभाराम मरण पावला.

सुभारामचा खून सुकलाल याने केल्यानंतर तो आणि अर्जुन असे दोघे जण सावदा रस्त्यावरील पेट्रोल पंपावर आले. त्याठिकाणी सुकलालने रक्तानेमाखलेले तोंड व हात धुतले. त्यानंतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघे परत आले. सकाळी आम्हाला उदळी या गावी आमच्या भावाकडे जायचे आहे असे म्हणत सुकलालने त्याचा शेतमालक जितेंद्र चौधरी यांच्याकडून पैसे मागितले. पैसे हाती पडल्यानंतर सुकलाल आणि अर्जुन असे दोघे जण उदळी येथे निघून गेले.

दुस-या दिवशी 30 मार्च 2024 रोजी सकाळी सुभाराम बारेला हा नेहमीप्रमाणे गुरांना चारापाणी देण्यासाठी शेतमालकाच्या वाड्यावर आला नाही. सुभाराम का आला नाही म्हणून शेतमालक लोकेश बेंडाळे विचारात पडले. त्यांनी थोडावेळ तो येण्याची वाट पाहिली. मात्र बराच वेळ झाला तरी देखील सुभाराम आलाच नाही. दरम्यान शेताच्या दिशेने जाणा-या अनिल तायडे या ट्रॅक्टर चालकास त्यांनी थांबवले. तुम्हाला सुभाराम भेटला तर त्याला आमच्या वाड्याकडे लवकर पाठवून द्या असे त्यांनी त्याला सांगितले. त्यानंतर शेतमालक लोकेश बेंडाळे आपल्या कामात मग्न झाले.

त्यानंतर काही वेळाने त्यांना ट्रॅक्टर चालक अनिल तायडे यांचा फोनवर निरोप आला. सुभारामचा कुणीतरी दगडाने ठेचून खून केला असल्याचा पलीकडून फोनवर बोलणा-या अनिल तायडे यांनी बेंडाळे यांना सांगितले. अनिल  तायडे यांनी शेतात जावून अगोदर सुभाराम यास आवाज दिला होता. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता खूनाचा प्रकार उघडकीस आला. सुभाराम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याच्या छातीवर मोठा दगड  पडलेला होता. तो रक्ताने माखलेला होता.

या घटनेची माहिती लागलीच सावदा पोलिस स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती समजताच सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे  यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. लोकेश बेंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलिस स्टेशनला याप्रकरणी अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 63/24 भा.दं.वि. 302 नुसार दाखल या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे  यांनी सुरु केला. स.पो.नि. जालिंदर पळे व त्यांच्या पथकाने लागलीच धाव घेत तेथील परिस्थीची पाहणी करत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. आजुबाजुच्या परीसरातील सालगडी म्हणुन काम करणा-या सर्व मजुरांची त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने माहीती संकलीत केली. दोन सालगडी त्याच्या कामाच्या व राहण्याच्या जागी गैरहजर आढळून आले.

त्या दोघांची माहिती संकलीत केली असता त्यांनी त्याच्या शेत मालकाकडून सकाळीच रोजंदारीचे पैसे घेतल्याची माहिती पुढे आली. सुकलाल रतन बारेला आणि अर्जुन मुन्ना बारेला या दोघांवर संशयाची सुई  स्थिरावली होती. त्यातील एकाचे नातेवाईक उदळी या गावाच्या हद्दीत रहात असल्याचे पोलिस पथकाला समजले. त्यानुसार त्या गावी व ठिकाणी पोलीस पथक गेले. दोघा संशयिताना वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणले गेले. दोघांना सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे  यांच्यासमक्ष हजर  करण्यात आले. स.पो.नि. जालिंदर पळे यांनी आपल्या खास पद्धतीने त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे, सफौ संजय देवरे, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोहेकॉ देवेंद्र पाटील, पोहेकॉ विनोद तडवी, पोकॉ. प्रकाश जोशी, किरण पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नव्हती. मात्र त्वरीत हालचाल व चौकशी करत अवघ्या चार तासात दोघा संशयीत आरोपींना निष्पन्न करण्यात स.पो.नि. जालिंदर पळे व त्यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here