मुलीसह पत्नीच्या हत्येनंतर तरुणाची आत्महत्या

जळगाव : माहेरी असलेल्या पत्नीसह अवघ्या नऊ महिन्याच्या मुलीचा दुहेरी निघृण खून केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची  घटना जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे शुक्रवारी उघडकीस आली. विशाल मधुकर झनके असे दुहेरी खून केल्यानंतर आत्महत्या करणा-या आरोपी तरुणाचे नाव आहे.

प्रतिभा विशाल झनके (26) आणि दिव्या झनके (वय 9 महिने) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. किरकोळ घरगुती वादामुळे प्रतिभा ही माहेरी देऊळगाव गुजरी येथे राहण्यास आली होती. ती पोलिस पाटील राजेंद्र इंगळे यांची मुलगी होती. शुक्रवारी दुपारच्या वेळी घरात कुणीही नसतांना संशयित पती विशाल झनके याने तीक्ष्ण हत्याराने वार करून पत्नी व मुलीला संपवले. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सोडून त्याने घरामागील शेतातून पलायन केले.

विशाल याने स्वतःसह पत्नी व मुलीला का संपवले याचे नेमके कारण समजू शकले नाही. पत्नी व मुलीच्या दुहेरी हत्येनंतर विशाल झनके याने जांबूळधाबा शिवारात स्वतःच्या पायाला  दगड बांधून नजीकच्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मोठी मुलगी प्रिया हिला घरी ठेवून तो सासुरवाडीला देऊळगाव येथे गेला होता. त्यामुळे ती बचावली. घटनेची माहिती समजल्यानंतर पाचोरा विभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, सहायक फौजदार अनिल सुरवाडे, प्रवीण चौधरी, गनी तडवी मुकेश पाटील, विनोद पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here